आजार बरे करण्यासाठी उपचारांना साधनेची जोड द्या ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘इंडियन मेडिकल असोसिएशन, इंदूर’ यांच्या वतीने ‘चिकित्सा आणि अध्यात्म’ विषयावर मार्गदर्शन !

‘इंडियन मेडिकल असोसिएशन, इंदूर’

इंदूर (मध्यप्रदेश) – आज अनेक आजार असे आहेत की, ज्यांची कारणे किंवा त्यावरील उपचार आधुनिक विज्ञानाकडेही नाहीत; परंतु आयुर्वेद असे सांगतो की, आपल्या जीवनातील काही आजारांसाठी मागील जन्माचे कर्म किंवा त्रास हे कारणीभूत असू शकतात. त्यामुळे रुग्ण बरे करण्यासाठी उपचारांना साधनेची जोड देणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन, इंदूर’ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते ‘चिकित्सा आणि अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन करत होते.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे स्वागत करतांना ‘इंडियन मेडिकल असोसिएशन, इंदूर’च्या पदाधिकारी

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री सरस्वतीदेवीचे पूजन करण्यात आले. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे स्वागत हृदयरोगतज्ञ डॉ. अजय भटनागर यांनी केले. ‘महात्मा गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये झालेल्या या कार्यक्रमाला आधुनिक वैद्य (डॉक्टर), रुग्णसेवेतील कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्वसनरोगतज्ञ डॉ. सलील भार्गव यांनी प्रयत्न केले.

मार्गदर्शन करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

सद्गुरु डॉ. पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘जीवनात साधना करण्यासाठी किंवा अध्यात्मानुसार जीवन जगण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. त्यामुळे ज्या क्षणी आपल्याला साधना समजली, त्याच क्षणी साधनेला प्रारंभ केला पाहिजे. आजच्या युवकांचा अभ्यासापासून व्यवहारामध्ये स्थिरस्थावर होण्यापर्यंतचा काळ अत्यंत संघर्षाचा असतो. त्यांनी जीवनात अध्यात्म आणि साधना यांची जोड दिली, तर ते कोणत्याही परिस्थितीचा चांगल्या प्रकारे सामना करू शकतात. आज आधुनिक यंत्रांच्या माध्यमातूनही नामजप, साधना इत्यादींचा मनुष्यावर काय परिणाम होतो, हे जाणून घेता येते. अनेक देश आणि विद्यापिठे संस्कृत अन् अध्यात्म यांचा स्वीकार करत आहेत. त्यामुळे आपण साधनेने स्वतःचे जीवन पालटण्यासह रुग्णांनाही साहाय्य करू शकतो.

कार्यक्रमाला उपस्थित आधुनिक वैद्य (डॉक्टर), रुग्णसेवेतील कर्मचारी आणि विद्यार्थी
उपस्थित रुग्णसेवेतील कर्मचारी आणि विद्यार्थी
  • या वेळी हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. संजय दीक्षित म्हणाले, ‘‘संपूर्ण जगात भारताला आध्यात्मिकतेसाठी ओळखले जाते. जागतिक आरोग्य संघटनेनेही आज आरोग्याच्या व्याख्येत आध्यात्मिकतेला समाविष्ट केले आहे.’’
  • कार्यक्रमाचे आयोजक श्वसनरोग विशेषज्ञ डॉ. सलील भार्गव म्हणाले, ‘‘माझा आध्यात्मिकतेकडे पुष्कळ कल आहे. जीवनात अनेक वेळा आपण काय करत आहोत ? हे आपल्यालाच कळत नाही. आपण अध्यात्म वैज्ञानिक भाषेत समजून घेऊन त्याला जीवनात उतरवले, तर निश्चितपणे आपल्या जीवनात परिवर्तन येऊ शकते.’’

क्षणचित्र

कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.