कडेगाव (जिल्हा सांगली), १९ ऑगस्ट (वार्ता.) – येथील किरण मेडिकल ते आयसीआयसी बँक हा रस्ता ३ मासांपूर्वी निर्माण करण्यात आला होता; मात्र सध्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साठली आहेत. १४ लाख रुपये व्यय करून झालेल्या या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याविरोधात युवासेनेचे कडेगाव शहरप्रमुख राहुल चन्ने यांच्या नेतृत्वाखाली १९ ऑगस्ट या दिवशी येथे आंदोलन करण्यात आले.
यापुढील काळात प्रशासनाने याची नोंद न घेतल्यास आम्हाला न्यायालयात जावे लागेल, अशी चेतावणी राहुल चन्ने यांनी या वेळी दिली आहे. या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुभाष मोहिते, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे, शशिकांत साळुंखे, अशोक सूर्यवंशी, वैभव डवरी, अनिल देसाई यांच्यासह कडेगाव तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.