विधानसभेच्या अधिवेशनासाठी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून पक्षादेश !

डावीकडून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे

मुंबई – शिवसेनेच्या ५४ आमदारांपैकी एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या ४० आमदारांनी विधानसभेसाठी स्वतंत्र पक्षप्रतोदाची नियुक्ती केली आहे, तसेच उद्धव ठाकरे यांच्या गटानेही पक्षप्रतोद नियुक्त केले आहेत. त्यामुळे या अधिवेशनात विधानसभेत शिवसेनेचे २ पक्षप्रतोद असणार आहेत. यामुळे विधानसभेत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून सुनील प्रभु यांची, तर शिंदेगटाकडून भरतशेठ गोगावले यांची पक्षप्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधीमंडळाच्या कामकाजाच्या वेळी आमदारांनी सभागृहात उपस्थित रहावे, यासाठी दोन्ही पक्षप्रतोदांनी पक्षादेश काढला आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून शिंदेगटात गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेविषयी सर्वाेच्च न्यायालयात खटला चालू आहे. असे असले तरी यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी भरतशेठ गोगावले यांना शिवसेनेचे पक्षप्रतोद म्हणून मान्यता दिली आहे.