चीन थायलंडसमवेत करणार युद्धाभ्यास !

अमेरिकेनेही इंडोनेशियात केला ऑस्ट्रेलिया, जपान आणि सिंगापूर यांच्या हवाईदलांच्या समवेत युद्धाभ्यास !

बीजिंग – चिनी लढाऊ विमाने आणि ‘बाँबर्स’ यांना संयुक्त युद्धाभ्यासासाठी थायलंड येथे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती चीनच्या संरक्षण मंत्रालयाने १३ ऑगस्ट या दिवशी दिली. ‘फॅल्कॉन स्ट्राईक २०२०’ नावाने हा अभ्यास उत्तर थायलंड येथे होणार आहे. उभय देशांच्या हवाई दलांमधील परस्पर विश्‍वास आणि मैत्री वाढावी, तसेच प्रायोगिक स्तरावरील सहकार्य अन् विकासाला प्रोत्साहन मिळावे, हे या युद्धाभ्यासामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

ऑगस्ट मासाच्या आरंभी अमेरिकी संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला अचानक भेट दिल्यानंतर संतापलेल्या चीनचे हे नवे पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे अमेरिकाही इंडोनेशियामध्ये ऑस्ट्रेलिया, जपान आणि सिंगापूर यांच्या सैन्यांसमवेत युद्धाभ्यास करत आहे, अशी माहिती अमेरिकी हवाईदलाचे वरिष्ठ अधिकारी जॉन ऍक्विलिनो यांनी दिली. ‘अस्थिरता निर्माण करणार्‍या चीनच्या कृत्यांना आळा घालण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत’, असे ऍक्विलिनो म्हणाले. कोणत्याही प्रकारच्या आणीबाणीसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम रहाता यावे, हा अमेरिकेचा या सरावामागील उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.