महाराष्ट्रातील नवीन मंत्रीमंडळातील १५ मंत्र्यांवर पूर्वीच गुन्हे नोंद

मुंबई – राज्यात ९ ऑगस्ट या दिवशी मंत्रीमंडळ विस्तारानंतर मंत्रीमंडळात १८ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. यांपैकी १५ जणांनी (म्हणजे ७५ टक्के मंत्र्यांनी) त्यांच्या विरोधात गुन्हे नोंद असल्याची माहिती वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. ‘असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स’ (ए.डी.आर्) या संस्थेने विस्तारित मंत्रीमंडळातील मंत्र्यांवरील गुन्हेगारी खटल्यांविषयीच्या प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे.

हे सर्व मंत्री कोट्यधीश असून त्यांची सरासरी मालमत्ता ४७ कोटी ४५ लाख रुपये आहे. त्यात सर्वाधिक मालमत्ता मलबार हिल मतदारसंघाचे भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा (४४१ कोटी ६५ लाख रुपये) आहे, तर संदिपान भुमरे यांची मालमत्ता सर्वांत अल्प (२ कोटी ९२ लाख रुपये) आहे. ८ मंत्री इयत्ता दहावी ते बारावीपर्यंत शिकले आहेत, तर ११ मंत्री पदवीधारक आहेत.