(म्हणे) ‘औरंगजेब वाईट बादशाह नव्हते, त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे !’

अबू आझमी यांची गोबेल्स नीती

मुंबई – औरंगजेब यांचा खरा इतिहास दाखवला, तर हिंदू अप्रसन्न होणार नाहीत. अनेक लोकांचे नाव ‘औरंगजेब’ ठेवण्यात आले आहे. औरंगाबादमध्येही अनेकांचे नाव ‘औरंगजेब’ असल्याचे आपल्या लक्षात येईल. ३६ जिल्ह्यांत ३ नावे उस्मानाबाद, अहमदनगर, औरंगाबाद अशी आहेत. औरंगजेब हे वाईट बादशाह नव्हते. त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे, असे इतिहासद्रोही मत समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी व्यक्त केले.

अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणाप्रमाणे कर्जतमध्ये एका तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत प्रकरणाचा छडा लावत ‘आरोपींना शिक्षा देण्यात येईल आणि हिंदूंवरील आक्रमणे खपवून घेतली जाणार नाहीत’ असे म्हटले. या पार्श्‍वभूमीवर अबू आझमी यांनी वरील वक्तव्य करून ‘देशात मुसलमानांवरही आक्रमणे होत आहेत’, असे म्हटले आहे. (मुसलमानांवर आक्रमण झाल्याची संख्या अत्यल्प आहे, तर हिंदूंवर आक्रमण झाल्याची संख्या शेकड्यानी आहे, हे आझमी का सांगत नाहीत ? – संपादक)

संपादकीय भूमिका

हिंदु जनतेवर सर्वप्रथम शरीयत कायदा लादणारा, जिझिया कर लादणारा, स्वतःच्या वडिलांना कारागृहात टाकून सर्व भावंडांना मारणारा, छत्रपती संभाजी महाराजांचे अनन्वित हाल करून त्यांना मारणारा, हिंदु स्त्रियांवर अत्याचार करणारा, लक्षावधी हिंदूंच्या हत्या करणारा, मंदिरे उद्ध्वस्त करणारा क्रूर औरंगजेब हा ‘वाईट बादशाह नव्हता’, असे औरंगजेबी मानसिकताच जोपासणार्‍या अबू आझमी यांना वाटणे साहजिक आहे !

(गोबेल्स नीती म्हणजे सतत खोटे बोलून खरे भासवणे)