दोन्ही देशांत चर्चा होईपर्यंत चीनने त्याची गुप्तहेर नौका श्रीलंकेत पाठवू नये !

  • श्रीलंकेचा चीनला संदेश !

  • भारताने या नौकेवरून श्रीलंकेकडे नोंदवला होता आक्षेप !

चीनची ‘युआन वांग ५’ ही गुप्तहेर नौका

कोलंबो (श्रीलंका) – जोपर्यंत दोन्ही देशांत सविस्तर चर्चा होत नाही, तोपर्यंत चीनने त्याची ‘युआन वांग ५’ ही गुप्तहेर नौका श्रीलंकेमध्ये पाठवू नये, अशी सूचना श्रीलंकेच्या सरकारने चीनला दिली. ही नौका येत्या ११ ऑगस्ट या दिवशी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात येऊन ती १७ ऑगस्टपर्यंत तेथे रहाणार होती. या नौकेच्या श्रीलंकेत येण्याविषयी भारतानेही श्रीलंकेकडे आक्षेप नोंदवला आहे. ‘भारताच्या दबावामुळेच श्रीलंकेने चीनला वरील सूचना केली असण्याची शक्यता आहे’, असे म्हटले जात आहे.

सध्या ही नौका तैवानजवळील समुद्रात आहे. या नौकेवर अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे ही नौका श्रीलंकेत पोचली, तर ती तेथून भारतातील काही ठिकाणांची टेहाळणी करून संवेदनशील माहिती गोळा करू शकते.