आतंकवादी दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुरेशी याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अटक

मुंबई – कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याचा जवळचा सहकारी सलीम कुरेशी याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मुंबई येथून अटक केली. कुरेशी याला ‘सलीम फ्रूट’ या नावानेही ओळखले जाते. त्याचा दक्षिण मुंबई येथे फळ विकण्याचा व्यवसाय आहे. तो कुख्यात गुंड छोटा शकील याचा मेहुणा आहे.

१. दाऊद इब्राहिम याने भारतावर आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचला होता. भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी दाऊदने पाकिस्तान येथे विशेष पथक सिद्ध केले होते. या पथकाद्वारे भारतातील काही राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने भारतातील दाऊदच्या सहकार्‍यांची धडपकड केली.

२. दाऊद इब्राहिम याच्या सहकार्‍यांच्या विरोधात कारवाई करतांना मे मासात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मुंबई आणि ठाणे येथे २० ठिकाणी धाड टाकल्या होत्या. या वेळी अन्वेषण यंत्रणेने सलीम कुरेशी याचीही चौकशी केली होती.

३. छोटा शकील हा दाऊदसाठी पाकिस्तान येथे काम करत आहे. पैसे घेऊन तो लोकांना ठार मारतो. त्याच्याविरुद्ध खंडणीचे अनेक गुन्हे नोंद आहेत. अन्वेषण यंत्रणेला प्राप्त झालेल्या माहितीनुसार सलीम कुरेशी हा पाकिस्तानमध्ये छोटा शकील याच्या घरी गेला होता. फेब्रुवारी २०२२ मध्ये दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक करण्यात आली होती.

या वेळी अंमलबजावणी संचालनालयाकडून सलीम कुरेशी याचेही अन्वेषण करण्यात आले होते. दाऊद इब्राहिम याची बहीण हसिना पारकर हिच्या आर्थिक व्यवहारात मध्यस्थ म्हणून काम केल्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून सलीम कुरेशी याचे अन्वेषण करण्यात आले होते.