भारताच्या आक्षेपानंतरही चीनची गुप्तहेर नौका ११ ऑगस्टला श्रीलंकेत पोचणार !

भारताच्या क्षेपणास्त्र, नौदल तळ आणि ‘इस्रो’च्या केंद्रापर्यंतची हेरगिरी करण्याचा धोका

चीनचे गुप्तचर जहाज ‘युआन वांग-५’

नवी देहली – श्रीलंका आर्थिक दिवाळखोर झालेला आहे. श्रीलंकेच्या या स्थितीमध्ये भारत त्याला सर्वप्रकारचे साहाय्य करत आहे; मात्र असे असतांनाही श्रीलंकेचे ‘चीनप्रेम’ अल्प झालेले नाही. चीनचे गुप्तचर जहाज ‘युआन वांग-५’ हे ताशी ३५ किलोमीटर वेगाने भारताच्या हेरगिरीसाठी श्रीलंकेच्या दिशेने जात आहे. हे जहाज ११ ऑगस्ट या दिवशी हंबनटोटा येथे पोचण्याची शक्यता आहे. याविषयी भारताने श्रीलंकेकडे निषेध नोंदवला आहे; मात्र तरीही श्रीलंकेने या जहाजाला हंबनटोटा बंदरात येण्यास अनुमती दिली आहे. यामुळे भारत सतर्क झाला आहे. भारतीय नौदलाकडून जहाजाच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. हंबनटोटामध्ये हे जहाज १७ ऑगस्टपर्यंत राहील. हंबनटोटा हे बंदर चीनने श्रीलंकेकडून ९९ वर्षांच्या भाडेपट्टीवर घेतले आहे. भारताच्या मुख्य नौदल तळ आणि अणु प्रकल्प यांची हेरगिरी करण्यासाठी चीन हे जहाज श्रीलंकेत पाठवत असल्याचेही काही तज्ञांचे म्हणणे आहे.

श्रीलंकेतून भारताची हेरगिरी करणे सोपे

हंबनटोटा बंदरात पोचल्यानंतर या जहाजाला दक्षिण भारतातील कल्पक्कम्, कुडनकुलम् यांसारख्या प्रमुख सैन्य आणि आण्विक तळांवरील माहिती सहज मिळवणे शक्य होणार आहे. केरळ, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश येथील बंदरे चीनच्या रडारवर असतील. या जहाजाला अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे हे जहाज श्रीलंकेच्या बंदरावर उभे राहून भारताच्या अंतर्भागापर्यंतची माहिती गोळा करू शकते. यासह पूर्व किनारपट्टीवर असलेले भारतीय नौदल तळ या जहाजाच्या निशाण्यावर असेल. ओडिशाच्या चांदीपूरमधील ‘इस्रो’चे प्रक्षेपण केंद्रही जहाजाच्या रडारवर असू शकते. एवढेच नाही, तर देशाच्या ‘अग्नी’सारख्या क्षेपणास्त्राची कार्यक्षमता, मारक क्षमता आदी सर्व माहिती या जहाजाकडून गोळा केली जाऊ शकते.

संपादकीय भूमिका

जोपर्यंत भारत चीनला धडा शिकवणार नाही, तोपर्यंत चीन अशीच दादागिरी करत राहील, हे लक्षात घेऊन सरकारने आता तरी चीनला समजेल अशा भाषेत धडा शिकवला पाहिजे !