विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन करण्याचा हिंदु संघटनांच्या बैठकीत एकमुखी निर्णय !

शासकीय विश्रामधाम येथे बैठकीत मार्गदर्शन करतांना श्री. विक्रम पावसकर, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ

सांगली, ४ ऑगस्ट (वार्ता.) – नुकतीच शासकीय विश्रामधाम येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची ‘हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे एकत्रीकरण’ आणि ‘विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमण’ या दोन विषयांच्या संदर्भात चर्चा झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ‘गड-किल्ला दक्षता समिती’चे सदस्य आणि भाजप नेते माजी आमदार श्री. नितीन शिंदे हे होते. या बैठकीत विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन करण्याचा हिंदु संघटनांच्या बैठकीत एकमुखी निर्णय घेण्यात आला.

या प्रसंगी ‘हिंदू एकता आंदोलना’चे सातारा जिल्हाध्यक्ष आणि भाजपचे महाराष्ट्र सचिव श्री. विक्रम पावसकर म्हणाले, ‘‘सध्या श्रावण मास चालू असून या मासातील शेवटच्या सोमवारी विशाळगड येथील महादेव मंदिरात सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांतील सर्व हिंदुत्वनिष्ठ, शिवभक्त कार्यकर्ते यांनी पूजेसाठी एकत्र जमावे. त्या दिवशी अतिक्रमणांच्या विरोधातील लढ्याचा प्रारंभ करण्यात येणार आहे.’’ श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘ज्याप्रकारे प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखान आणि सय्यद बंडा यांच्या थडग्यांचे उदात्तीकरण आंदोलन करून रोखले तशाच पद्धतीने विशाळगड येथे झालेल्या मलिक रेहानच्या थडग्याचे उदात्तीकरण आपल्याला रोखायचे आहे.’’

या प्रसंगी भाजपचे नेते श्री. श्रीकांत शिंदे, श्री. अविनाश मोहिते, भाजप सांस्कृतिक आघाडीचे श्री. ओंकार शुक्ल, श्री. विजय कडणे, शिवसेनेचे सर्वश्री प्रसाद रिसवडे, नितीन काळे, राम काळे, गजानन मोरे यांसह भाजप, शिवसेना, हिंदू एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

राष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असणार्‍या गड-दुर्गांवरील अतिक्रमणास उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई हवी !