ठाणे, २८ जुलै (वार्ता.) – ठाणे जिल्ह्यात वराहज्वराचे (‘स्वाईन फ्ल्यू’चे) ३४ रुग्ण आढळले असून त्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मृतांमध्ये २ जण ठाणे येथील, तर १ जण ग्रामीण भागातील होता. जिल्ह्यात पावसाळ्याच्या कालावधीत साथीचे आजार पसरू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात औषध फवारणीसह अन्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यातील ६ महानगरपलिका, २ नगरपालिका आणि ग्रामीण भागात आतापर्यंत १ लाख १७ सहस्र ५९० संशयितांची चाचणी करण्यात आली. यामध्ये ३४ जणांच्या चाचणीचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. त्यांपैकी २२ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले. ६ जणांनी आजारावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक २० रुग्ण आढळून आल्याची नोंद आहे.