राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने !

आरे येथील मेट्रो कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवल्याचे प्रकरण

मुंबई – मेट्रोसाठी आरे येथील कारशेडच्या कामावरील स्थगिती २१ जुलै या दिवशी राज्य सरकारने उठवली. त्यामुळे राज्यासह देशभरात पुन्हा एकदा ‘आरे वाचवा’ मोहीम चालू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आम आदमी पक्षासह पर्यावरणप्रेमी, प्राणीप्रेमी हेही आंदोलनात सहभागी झाले आहेत. मुंबई, नागपूर, वाराणसी, भाग्यनगर (हैद्राबाद) या प्रमुख शहरांत आंदोलन करण्यात येत आहे.

वृक्षतोड आणि पर्यावरण यांचे कारण देत उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आरे येथील कारशेडचे काम थांबवून कांजूरमार्ग येथे कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा वाद न्यायालयातही पोचला होता. मुंबई महापालिकेतील वृक्ष प्राधिकरणाने आरे येथील झाडे तोडण्यास अनुमती दिल्यावर तेथे रात्रीच्या वेळी २ सहस्र ७०० झाडे तोडण्यात आली. हे लक्षात आल्यावर सामान्य जनता आणि पर्यावरणप्रेमी यांनी मोठे जनआंदोलन उभारले. ठाकरे सरकारने कामाकाजाच्या पहिल्याच दिवशी आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली होती; पण आता नव्या सरकारने आरे येथील कारशेडवरील स्थगिती उठवली आहे.