निवडणूक आयोगाची शिवसेनेतील दोन्ही गटांना नोटीस !

‘धनुष्यबाण’ पक्षचिन्हासाठी बहुमत सिद्ध करण्याचे प्रकरण

मुंबई – ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह मिळण्यासाठी बहुमत सिद्ध करण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना नोटीस दिली आहे. यासाठी आयोगाने ८ ऑगस्ट या दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत मुदत दिली आहे. शिवसेनेने या विरोधात याला स्थगिती देण्यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना बहुमताचे कागदोपत्री पुरावे सादर करण्याचा आदेश दिला आहे. वर्ष १९६८ च्या निवडणूक चिन्ह (राखीव आणि वाटप) नियमावलीतील कलम १५ नुसार आयोगाकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या एका गटाने भाजपच्या साहाय्याने सत्ता स्थापन केल्यावर उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील उर्वरित गटाने एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी सर्वाेच्च न्यायालयाकडे केली. शिंदे यांनी आपण शिवसेनेतून बाहेर पडलो नसून ‘आम्हीच शिवसेना’ असल्याचे सांगत शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या पक्षचिन्हावर दावा केला. हा वाद राज्य निवडणूक आयोगाकडे गेला आहे. याविषयी उद्धव ठाकरे यांच्या गटाने ‘पक्षचिन्हाविषयी निर्णय घेण्यापूर्वी आमचे मत विचारात घ्यावे’, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.