फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी अब्दुल जमील यांचा हिंदु धर्मात प्रवेश

फतेहपूर (उत्तरप्रदेश) – येथील संकटमोचन मंदिरात ६६ वर्षीय अब्दुल जमील यांनी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारला. या वेळी संबंधित विधी करण्यात आले. यानंतर त्यांचे नाव श्रवण कुमार ठेवण्यात आले. ते सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. गेल्या काही वर्षांपासून सनातन धर्माविषयी त्यांच्या मनात आवड निर्माण झाली होती. २ वर्षांपूर्वी त्यांनी हिंदु धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांची ओळख अखिल भारत हिंदु महासभेच्या प्रांतीय महामंत्र्यांशी झाली. त्यानंतर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

इस्लाम धर्मामध्ये पुष्कळ भेदभाव !

श्रवण कुमार म्हणाले, ‘‘इस्लाम धर्मामध्ये पुष्कळ भेदभाव आहे. येथे भाऊ भावाचा नाही. लोक स्वार्थी आणि संपत्तीसाठी हत्याही करतात. यामुळे मी त्रस्त होतो. मी निश्‍चय केला की, मी हिंदु धर्म स्वीकारीन. मी भगवान श्रीरामाची पूजा करतो आणि ते माझे आराध्य दैवत आहेत. मी जेव्हा प्रथमच ‘विष्णु विष्णु’ म्हणत हवन करू लागलो, तेव्हा मला पुष्कळ छान वाटले. मी धर्मांतर केले नसून माझ्या मूळ सनातन धर्मामध्ये परत आलो आहे. श्रीराम संपूर्ण भारताचे पूर्वज आहेत. त्यांचा सर्वांनी स्वीकार केला पाहिजे. हिंदु धर्म स्वीकारण्याचा माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. आमचे पूर्वज क्षत्रिय होते. माझ्या पणजोबांचे नाव पुत्तू सिंह होते. आमचा परिवार पूर्वी राजपुतांशी संबंधित होता.

मेहुण्याकडून मारहाण

श्रवण कुमार यांनी, ‘२ मासांपूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा हिंदु धर्माचा स्वीकार करण्याविषयी कुटुंबाला सांगितले, तेव्हा मला माझ्या बाबर या मेहुण्याने समजावण्याचा प्रयत्न केला. ‘मी ऐकत नाही’, असे दिसल्यावर त्याने मारहाणही केली. मला माझ्याच घरात कोंडून ठेवण्यात आले; पण माझा श्रीरामावर विश्‍वास होता. मी घरातच त्यांची पूजा करत होतो. आता मुला कुणाचीच भीती वाटत नाही. कुणी धमकी दिली, तर मी पोलिसांत तक्रार करीन. तसेच जिल्हाधिकार्‍यांकडे संरक्षणाची मागणी करीन’, असे सांगितले.