मुळशी (जिल्हा पुणे) तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के : ५०० मीटर भूमी दुभंगली !

मुळशी (जिल्हा पुणे) तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के

मुळशी (जिल्हा पुणे) – येथील धरण भागात मौजे निंबाळवाडी आणि मौजे वडगाव वाघवाडी येथे भूकंपाचे सौम्य धक्के बसले. या धक्क्यांमुळे अनुमाने ५०० मीटर भूमी दुभंगली आहे. मुळशी तालुक्यातील वाघवाडीत माळीणसारखी भूस्खलन सदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेत या परिसरातील ग्रामस्थांना स्थलांतरित केले आहे. मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण आणि गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी घटनास्थळाची पहाणी केली आहे. हा भाग टाटा धरणाच्या परिसरात येत असल्याने तात्पुरते साहाय्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

टाटा पॉवरने ही भूकंपाची स्पंदने नसून भूमीतील विस्फोट, भूस्खलन आदी स्वरूपाच्या आघातजन्य घटनांमुळे धक्के बसल्याचा अंदाज वर्तवला आहे.