भारताला मिळालेला धडा !

आसाम हे राज्य चहाच्या मळ्यांसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. तेथील चहाची गुणवत्ताही उत्कृष्ट असल्याने हा चहा जगभरात नावाजला जातो; पण सध्या त्या चहाच्या गुणवत्तेला गालबोट लागले आहे. इराण आणि तैवान या देशांनी आसाममधून निर्यात केलेला सुमारे ४० सहस्र किलो चहा परत केला आहे. चहामध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक कीटकनाशके असल्याचे कारण त्यांनी दिले. यामुळे भारतात ५३ टक्के चहाचे उत्पादन करणाऱ्या आसामच्या उत्पादकांची पुष्कळ हानी झाली आहे. आता चहाच्या माध्यमातून देशासमोर मोठे संकटच उभे ठाकले आहे. परत पाठवलेल्या ४० सहस्र किलो चहाचे आता करायचे तरी काय ? अनेक तज्ञ, कीटकनाशकांची फवारणी करणारे, तसेच दीर्घकाळ चहाचे उत्पादन करणारे उत्पादक यांच्या मते, सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार चहामध्ये काही ठराविक गोष्टींसाठी कीटकनाशकांचा मर्यादित प्रमाणात वापर करावा लागतो. या सर्वांनी त्या त्या मापदंडानुसार त्यांचे मत मांडलेले आहे. वर्ष २०२१ मध्ये भारतातून १९.३ कोटी किलो चहाची निर्यात झाली. त्यातील ४० सहस्र किलो चहा परत आला आहे. यामागे इराण आणि तैवान यांचे षड‌्यंत्र असल्याची चर्चा आहे. त्यांच्या षड्यंत्राचा विचार अवश्य करायलाच हवा; पण त्यांनी दिलेले कारणही भारताने नाकारून चालणार नाही. आज इराणची संपूर्ण बाजारपेठ भारतीय चहाच्या निर्यातदारांच्या कह्यात आहे. त्यामुळे चहा परत आला, इथवर थांबणे सयुक्तिक होणार नाही; कारण त्या बाजारपेठेचे दायित्व भारताचे आहे. ‘अन्य देशांकडून भारतीय चहाची अपकीर्ती केली जात आहे’, असा आरोप करण्यापेक्षा त्यांनी केलेल्या आरोपांवर भारताने सखोल विचार केल्यासच पुन्हा एकदा चहाच्या व्यापारात बाजारपेठ भरभराटीला येऊ शकते.

अधोगतीकडे वाटचाल !

‘शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे’, असे आपण मानतो. शेती भारतात पूर्वापार काळापासून चालत आली आहे. त्यानुसार ‘आसाम म्हणजे चहाचे मळे’ हेसुद्धा अनेक शतकांपासूनचे समीकरण आहे. तेव्हा तर कीटकनाशके अस्तित्वातच नव्हती, तरीही तेथील चहाचे मळे जगभरात नावाजलेले होते ! मग आताच आपल्याला त्यांची आवश्यकता का भासत आहे ? वैज्ञानिक निष्कर्षानुसार पाहिल्यास जरी काही प्रमाणात कीटकनाशके वापरली गेली, तरी ती वापरण्यामागील कारणांचा शोध घेणे क्रमप्राप्त आहे. खरे पहाता हे प्रत्येक भारतियाचे दायित्व आहे; कारण ही कीटकनाशके मनुष्याच्या अवयवांवर विपरीत परिणाम करतात. मध्यंतरी भारताच्या एका चहाच्या नमुन्यामध्ये ‘क्रोमियम’चे अंश आढळले होते; कारण त्या उत्पादनात स्टेनलेस स्टील यंत्राचा वापर करण्यात आला होता. परिणामी चीनने भारतातील त्या चहाचे उत्पादन नाकारले. जे इराण, तैवान आणि चीन यांना समजते, ते भारताच्या का लक्षात येऊ शकत नाही ? वर्ष २०१४ मध्ये ‘ग्रीनपीस’ संस्थेने भारतातील चहाच्या ४९ नमुन्यांची पडताळणी केल्यावर ६७ टक्के नमुन्यांमध्ये डीडीटी रसायन आणि ‘मोनोक्रोटोफॉस’ हे कीटकनाशक सापडले. खरेतर डीडीटीवर वर्ष १९८९ मध्येच बंदी घालण्यात आली होती; पण तरीही त्याचा वापर करण्यात आला. बंदी घातलेल्या कीटकनाशकांना जैविकतेचा मुलामा देऊन ती वापरण्यात येतात. ही आयातदार आणि जनता यांची शुद्ध फसवणूक नव्हे का ? खरेतर चहाचे पीक हे नैसर्गिकरित्याच वाढायला हवे. कीटकनाशके आणि रसायने यांच्या वापरामुळे चहाच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. मध्यंतरी श्रीलंकेत आलेल्या आर्थिक संकटामुळे भारतीय चहा उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला व्यवसाय वाढवण्याची मोठी संधी होती; पण मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात कीटकनाशके आणि रसायने यांचा वापर करण्यात आल्याने आर्थिक हानी सोसावी लागत आहे अन् भविष्यात ती अधिक प्रमाणात सोसावी लागण्याची शक्यताही आहे. ही भारताची विकासाकडे होणारी वाटचाल म्हणायची कि अधोगती म्हणायची ? ‘ग्रीनपीस’ संस्थेच्या आकडेवारीवरही कितपत विश्वास ठेवायचा ? हाही प्रश्न आहे; कारण ही संस्था भारतविरोधी कारवायांसाठी प्रसिद्ध आहे. तरीही ‘भारतातील चहा उत्पादकांचे काय चुकले ?’, याचे चिंतन होणे आवश्यक आहे.

भारताने शहाणे व्हावे !

पूर्वी भारतात शेतकरी नैसर्गिक शेती करत असत. तेव्हा ना कोणती कीटकनाशके किंवा रसायने वापरली जायची, ना कधी कोणती औषधयुक्त फवारणी करावी लागत असे; परंतु तरीही भारतातील उत्पादने देश-विदेशात निर्यात केली जायची. वर्ष १८२३ मध्ये प्रथमच भारतातून लंडनच्या बाजारात चहा विक्रीसाठी पाठवण्यात आला. डच आणि इंग्रज यांच्यानुसार, भारतीय चहा पोटशुद्धीसाठी अन् पाचक म्हणून उपयुक्त होता. निसर्गाच्या जोरावर केली जाणारी शेती विकासाचे धन भूमातेच्या पदरात आणत होती. त्यामुळे प्रत्येक शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी, समाधानी आणि आरोग्यसंपन्न होता. कालांतराने मनुष्य निसर्गाला ओरबाडायला लागल्यापासून शेतीची हानी होऊ लागली. रसायने, कीटकनाशके यांनी शेतीच्या बाजारात कधी शिरकाव केला ? आणि भारतीय शेतकरी त्यांच्या अधीन कधी झाला ? ते कळलेच नाही. अर्थात् याला उत्तरदायी कुणाला ठरवायचे ? तर केवळ अन् केवळ तत्कालीन काँग्रेस सरकारलाच ! कारण सत्तेची हवा डोक्यात गेलेल्या तत्कालीन काँग्रेस सरकारने शेतीतून भरघोस उत्पादन मिळवून आर्थिक भरभराट होण्यासाठी रासायनिक शेतीची निर्मिती करून भूमीची विल्हेवाट लावली. भूमी नापीक झाली.  उत्पादनच नसेल, तर उत्पन्न कुठून येणार ? या दुर्दैवी स्थितीत शेतकऱ्यासमोर एकमेव पर्याय उरला तो म्हणजे आत्महत्येचा ! यातून आत्महत्येचे सत्र चालू झाले, ते आजतागायत चालूच आहे. सध्या भारतातील शेतीशी संबंधित कोणतेही उत्पादन आज दुर्दैवाने नैसर्गिक राहिलेले नाही. इराण आणि तैवान यांची कृती म्हणजे भारताला मिळालेला एक धडाच आहे. भारताने आतातरी त्यातून शिकून शहाणे व्हावे, ही अपेक्षा !

इराण आणि तैवान यांच्या कृतीतून वेळीच धडा घेऊन भारताने शिकून शहाणे व्हावे !