कोल्हापूर, १४ जुलै (वार्ता.) – गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची वाटचाल इशारा पातळीकडे (३९ फूट) चालू आहे. १४ जुलै या दिवशी दुपारी १ वाजता ही पातळी ३७ फूट २ इंचावर पोचली. जिल्ह्यातील ५९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संभाव्य पूरस्थितीची पहाणी केली, तसेच स्थानिक ‘रेस्क्यू गटां’ना सतर्क रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागातील धबधबे पहाण्यासाठी पर्यटक गर्दी करत असून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.
कर्नाटकातील अलमट्टी धरणातून सध्या १ लाख २५ सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू करण्यात आला आहे. कोयना धरणात सध्या ४३.१८ ‘टी.एम्.सी.’ (क्षमता १०५ ‘टी.एम्.सी.’) पाणीसाठा असून सांगली येथील आयर्विन पूल येथे कृष्णा नदीतील पाण्याची पातळी १९ फूट ३ इंच आहे.