मुंबई – राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने घोषित केलेल्या अनुमानावरून राज्यातील काही ठिकाणी ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी दुर्घटना घडत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. ठिकठिकाणी पुरात लोक वाहून गेल्याच्या घटना घडत आहेत. रस्त्यांवर दरड कोसळण्याच्या घटना, तसेच पुलांवरून पुराचे पाणी वहात असल्याने अनेक ठिकाणी रस्ते आणि महामार्ग बंद झाले आहेत. १४ जुलै या दिवशी अमरावती शहरातील गांधी चौक ते रविनगर मार्गावर असलेली एक इमारत कोसळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मराठवाडा येथे अतीवृष्टी झाली आहे.
१. अमरावतीमध्ये गांधी चौकातील दुमजली इमारत कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
२. मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील माहूरगड दर्शनासाठी बंद करण्यात आला आहे. पैनगंगेला आलेल्या पुरामुळे विदर्भातून माहूरकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
३. तापी आणि पूर्णा या नद्यांना आलेल्या पुरामुळे जळगावमधील हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.
४. कोकण रेल्वेच्या मार्गावरील अंजनी ते चिपळूण रेल्वेमार्गावर दरडींची माती कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती.
५. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्यामुळे घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
६. मुसळधार पावसामुळे ठाणे, पालघर, नवी मुंबई, पुणे, नाशिक येथील शाळांना सुटी देण्यात आली.
७. पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे मुंबई-बडोदा महामार्गाच्या उड्डाणपुलाचे काम करणारे १० कामगार अडकून पडले होते. राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी केलेल्या प्रयत्नानंतर १५ घंट्यांनी सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले.
८. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील देव्हाडा येथे नृसिंह सरस्वती मंदिरात अडकलेल्या १५ भाविकांची १४ जुलै या दिवशी सकाळी सुखरूप सुटका करण्यात आली.
९. संभाजीनगर येथील जायकवाडी धरणात पाणीसाठा ५३ टक्के झाला आहे. गेल्या ५ दिवसांपासून नाशिक येथून झालेल्या विसर्गामुळे या धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.
१०. मराठवाड्यात हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांतील नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या अनेक गावांत पाणी शिरल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वहात असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
११. मुसळधार पावसामुळे कोकणात पर्यटन बंद आहे. ‘आवश्यकता असेल, तरच घराबाहेर पडा’, अशा सूचना जिल्हाधिकार्यांनी केल्या आहेत.
१२. पुणे येथील कामशेतजवळील वाडीवळे येथील इंद्रायणी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने ८ गावांचा संपर्क तुटला आहे.
१३. पुणे येथील मुठा नदीत १ व्यक्ती वाहून गेली. पुलावर अडकलेल्या त्याच्या मित्राला पोलीस आणि अग्नीशमनदल यांनी वाचवले आहे.
१४. मराठवाडा येथील हदगाव आणि भोकर येथे पुराच्या पाण्यात २ जण वाहून गेले आहेत. पैनगंगा नदीला पूर आल्याने विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. किनवटच्या २०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
अन्य घडामोडी१. विशाळगडाच्या भिंतीचा काही भाग पावसामुळे कोसळला आहे. २. सिंहगडाच्या जवळील भाग पावसामुळे कोसळला आहे. |