येत्या विधीमंडळ अधिवेशनात दक्षिण मुंबईत वीर सावरकर यांच्या शौर्यगाथेचे संग्रहालय उभारण्याचा आग्रह धरणार ! – अधिवक्ता राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अवघे आयुष्य प्रखर राष्ट्रभक्तीचे धगधगते अग्नीकुंड आहे. त्यांच्यासारखा वीरपुरुष शतकातून एकदाच जन्माला येतो. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रकार्याची माहिती देणारे संग्रहालय दक्षिण मुंबईत उभारावे, यासाठी येत्या अधिवेशनात आग्रह धरणार आहे, अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात घेतलेल्या ऐतिहासिक उडीला ८ जुलै या दिवशी ११२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त अधिवक्ता नार्वेकर यांनी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली.

अधिवक्ता नार्वेकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या वेळी ते म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या क्रांतीकारकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची देशातील नागरिकांना माहिती देणे, हे आपले कर्तव्य आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीकारकांनी मोठे योगदान दिले. क्रांतीकारकांना ‘वाट चुकलेले देशभक्त’ म्हणणे, हा त्यांच्यावर अन्याय आहे.’’

मार्सेलिस येथे वीर सावरकर यांचे स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

मार्सेलिस समुद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मारलेली उडी अयशस्वी असल्याचा प्रचार केला जातो; परंतु ही उडी ऐतिहासिक होती. इंग्रज भारतावर बळजोरीने राज्य करत असल्याचे सत्य या उडीमुळे संपूर्ण जगाला समजले. भारताचा स्वातंत्र्यलढा जगाच्या पटलावर आला. त्यामुळे त्या बंदरात वीर सावरकर यांचे स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत. यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आर्थिक साहाय्य करेल.

सावरकरांचे संसदीय क्षेत्रातील योगदान समजण्यासाठी उपाययोजना करण्याची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अनेक इंग्रजी शब्दांना मराठी शब्द दिले. ‘कायदा’ या पर्शियन शब्दाला ‘विधी’, तर ‘वकील’ म्हणजेच कायद्याचा तज्ञ, म्हणून तो ‘विधीज्ञ’ असा शब्द त्यांनी रुढ केला. अनेक संसदीय शब्द त्यांनी मराठीतून दिले. ‘विधान परिषद’, ‘विधीमंडळ’ हे शब्द त्यांनीच दिले. त्यांना संसदेत जाता आले नाही; पण त्यांनी संसदीय क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती विधीमंडळातील सदस्यांना व्हावी, या दृष्टीने उपाययोजना करावी, अशी मागणी या वेळी रणजित सावरकर यांनी अधिवक्ता राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.