चिनी भ्रमणभाष संचांच्या आयातीत तब्बल ५५ टक्क्यांनी घट !

‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने भारतियांची वाटचाल !

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारता’चे धोरण घोषित केल्यापासून भारत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. वर्ष २०२०-२१ मध्ये भारताने एकूण आयात केलेल्या वस्तू आणि सेवा यांच्यातील चीनचा सहभाग हा १६.५ टक्के होता. २०२१-२२ या आर्थिक वर्षात मात्र हे प्रमाण १५.४ टक्क्यांवर आले आहे.

चीनकडून आयात केल्याचे प्रमाण काही अंशीच उणावल्याचे दिसत असले, तरी चिनी भ्रमणभाष संचांच्या आयातीत मात्र तब्बल ५५ टक्क्यांची घट आली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात १.४ अब्ज डॉलरचे चिनी भ्रमणभाष संच आयात करण्यात आले होते. २०२१-२२ मध्ये मात्र हेच प्रमाण केवळ ६२५ कोटी डॉलरवर पोचले.