हिंदूंचे युवासंघटन : काळाची आवश्यकता !

अल्पसंख्यांक त्यांच्या स्वहिताचा पक्ष सत्तेत आल्यावर दबावाद्वारे कार्य करून घेतात, त्याप्रमाणे बहुसंख्य हिंदूंनी दबावगट सिद्ध करणे आवश्यक !  

कोरोनाच्या भीषण महामारीने रौद्ररूप धारण केले होते आणि जगभरात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. या काळात देवाच्या कृपेने युवा हिंदु संघटनासाठी आम्हाला उत्तम संधी मिळाली. काही सात्त्विक जीव जणू हिंदु राष्ट्राच्या कार्यात जोडण्यासाठी आमची वाटच बघत होते. या युवावर्गापर्यंत आम्ही पोचलो आणि कठीण काळातही युवा संघटन करता आले, यासाठी आम्ही देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

‘ऑनलाईन’ माध्यमातून ‘कॉन्फरन्स’ घेता येऊ शकते; पण संघटन कसे करणार ? मात्र भगवंताच्या कृपेने आम्ही ‘ऑनलाईन’ स्वरक्षण प्रशिक्षण वर्गही घेतले, तसेच ते अखंड चालूही ठेवले. या २ वर्षांच्या कालावधीत युवा संघटनासाठी जे प्रयत्न झाले, ते येथे देत आहोत.

श्री. निरंजन चोडणकर
श्री. हर्षद खानविलकर
म्हापसा येथील श्री महारुद्र संस्थानात गदापूजन करतांना धर्माभिमानी श्री. श्यामा साखळकर

१. कोरोना काळात राबवण्यात आलेले विविध उपक्रम

१ अ. साप्ताहिक ‘स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग’ : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु युवक-युवतींना शारीरिक आणि मानसिक दृष्टीने सक्षम बनवण्यासाठी त्यांना कराटे, लाठी आणि दंडसाखळी यांचे प्रशिक्षण दिले जाते. सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात ऑनलाईन अन् प्रत्यक्ष, असे मिळून ९५ प्रशिक्षणवर्ग चालू आहेत. या वर्गांच्या माध्यमातून ४०० हून अधिक युवा प्रशिक्षण घेत आहेत.

१ आ. ‘ऑनलाईन’ प्रशिक्षक प्रशिक्षणवर्ग : स्वरक्षण प्रशिक्षण वर्गांतील युवांपैकी स्वतः हे प्रशिक्षणवर्ग घेऊ शकतात, अशा युवक युवतींसाठी आम्ही १० दिवसांचे ‘ऑनलाईन’ प्रशिक्षकवर्ग घेतले. या प्रशिक्षक प्रशिक्षण वर्गाचा लाभ १०० जणांनी घेतला आणि आता असे १०० प्रशिक्षक सिद्ध झाले आहेत.

१ इ. राष्ट्रीय स्तरावरील ‘ऑनलाईन’ माध्यमिक स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग : प्रशिक्षकांची चांगली सिद्धता व्हावी, या उद्देशाने प्रत्येक रविवारी सर्व प्रशिक्षकांचा आम्ही प्रशिक्षणवर्ग घेतो. या वर्गाला ७० प्रशिक्षक नियमित उपस्थित असतात.

१ ई. ‘ऑनलाईन’ आणि प्रत्यक्ष शिबिर : प्रशिक्षकांना घडवण्यासाठी विविध ‘ऑनलाईन’ आणि प्रत्यक्ष शिबिरे घेण्यात आली. ३ ‘माध्यमिक युवा संघटक शिबिरां’तून ८१ जणांनी, एक दिवसाच्या १० शिबिरांतून २०० जणांनी आणि दोन दिवसांच्या १२ शिबिरांतून १५० जणांनी या शिबिरांचा लाभ घेतला.

१ उ. शौर्यजागृती वर्ग : नियमित ७ दिवस प्रतिदिन १ घंटा याप्रमाणे आम्ही ‘शौर्यजागृती वर्ग’ हा ‘क्रॅश कोर्स’ (जलदगती प्रशिक्षण) ऑनलाईन आणि प्रत्यक्ष, अशा दोन्ही स्तरांवर चालू केला. मागील दोन वर्षांत असे २२० शौर्यजागृती वर्ग झाले. यांतून ३ सहस्र युवक-युवती प्रशिक्षित झाले. विशेष म्हणजे यात १ सहस्र २०० युवतींचा सहभाग होता.

१ ऊ. बलोपासना सप्ताह : वर्ष २०२१ च्या श्रीरामनवमी ते हनुमानजयंती या कालावधीत प्रतिदिन सकाळी ६ ते ७ या वेळेत आम्ही ‘बलोपासना सप्ताह’ चालू केला. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रभु श्रीराम आणि हनुमान यांची शक्ती मिळावी, हा उद्देश ठेवून हे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्रीराम आणि हनुमान यांच्या जपाद्वारे ‘उपासनेची शक्ती’ वाढवणे आणि शारीरिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून ‘शक्तीची उपासना’ करण्यात आली. या बलोपासना सप्ताहाचा ५८० युवांनी लाभ घेतला. भगवंताच्या कृपेने हा उपक्रम नियमित बलोपासनेमध्ये रूपांतरित होऊन प्रतिदिन सकाळी अखंडपणे चालू आहे. यावर्षीही या सप्ताहाचा ३५० जणांनी लाभ घेतला.

१ ए. शौर्यजागृती व्याख्याने : गेल्या ७५ वर्षांत हिंदूंना शौर्यजागृतीविषयी कुणी शिकवले नाही. त्यामुळे आज राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती अत्यंत केविलवाणी झाली आहे. यासाठी हिंदूंमध्ये शौर्यजागृती होण्यासाठी २९० व्याख्याने आयोजित करण्यात आली. या व्याख्यानांचा १२ सहस्र जणांनी लाभ घेतला.

१ ऐ. व्याख्यानमाला

१ ऐ १. नवरात्रोत्सवानिमित्त व्याख्याने : आदिशक्तीचा जागर करण्यासाठी नवरात्रीच्या कालावधीत महिलांसाठी १५ ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्याने घेण्यात आली होती. या व्याख्यानांचा लाभ २ सहस्र ५०० महिलांनी घेतला.

१ ऐ २. स्वातंत्र्यगाथा व्याख्याने : आपल्या क्रांतीकारकांनी भारतमातेसाठी केलेल्या त्यागातून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्राच्या कार्यात योगदान देता यावे, या उद्देशाने ‘स्वातंत्र्यगाथा’ व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. १ ते १५ ऑगस्ट २०२१ या १५ दिवसांत झालेल्या ११५ व्याख्यानांचा २ सहस्र १०० युवकांनी लाभ घेतला.

१ ऐ ३. दिनविशेष व्याख्याने : छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक आदींचे स्मृतीदिन आदी विविध दिनी घेतलेल्या शौर्यजागृती व्याख्यानांचा शेकडो युवांनी लाभ घेतला.

१ ऐ ४. गुरुपौर्णिमा प्रवचने : हिंदु धर्मातील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व युवकांवर बिंबवण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या कालावधीत प्रवचने आयोजित करण्यात आली होती. याचाही ३५० युवक-युवतींनी लाभ घेतला.

१ ऐ ५. विशेष मार्गदर्शन : युवांसाठी वेळोवेळी समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, राज्य संघटक श्री. सुनील घनवट आदींची मार्गदर्शनेही आयोजित केली जातात.

१ ओ. प्रथमोपचारवर्ग : आपत्कालीन स्थितीत समाजाला साहाय्य करता यावे, या दृष्टीने ४० जिल्हा प्रशिक्षक आणि सहप्रशिक्षक, तसेच १८० युवक यांना प्रथमोपचाराचे ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण देण्यात आले.

१ औ. आपत्कालीन साहाय्य प्रशिक्षण : येणाऱ्या भीषण आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून समाजाला साहाय्य आणि समाजरक्षण करण्याचे प्रशिक्षण ३० प्रशिक्षकांना देण्यात आले. यामध्ये अग्नीशमन प्रशिक्षण, आपत्कालीन साहाय्याच्या विविध पद्धती आदींचे प्रशिक्षण देण्यात आले.

१ अं. जनजागृती मोहिमा : युवकांच्या माध्यमातून विविध जनजागृती मोहिमा राबवण्यात आल्या. उदा. ३१ डिसेंबरच्या निमित्ताने घेतलेल्या ‘संस्कृतीरक्षण मोहिमे’त २४९ युवक सहभागी झाले होते. या युवकांनी ३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी ११४ ठिकाणी निवेदने दिली. ५६ ठिकाणी व्याख्याने आयोजित करण्यात आली. या व्याख्यानांना ३ सहस्र ५२ इतकी उपस्थिती लाभली. ९१ रिक्शांवर फ्लेक्स लावण्यात आले. ९६ ठिकाणी फलकप्रसिद्धी करण्यात आली. ३९ ठिकाणी पत्रकांच्या ‘प्रिंट’ काढून लावण्यात आल्या.

१ क. ‘गदापूजन’ उपक्रम : हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या गदेच्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक बळ प्राप्त व्हावे, या उद्देशाने संपूर्ण भारतात २३० ठिकाणी गदापूजन करण्यात आले. या पूजनाचा एकूण ७ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंनी लाभ घेतला.

१ ख. ‘ऑनलाईन’ संपर्क अभियान (‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे) : कोरोना काळात अनेकांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नव्हते, अशा वेळी ‘ऑनलाईन’ संपर्क अभियान राबवण्यात आले. यामध्ये २०० युवक-युवतींना संपर्क केले. या वेळी त्यांच्या कुटुंबियांशीही संवाद साधण्यात आला.

१ ग. ‘ऑनलाईन’ अभ्यासवर्ग : केवळ शारीरिक प्रशिक्षणच नव्हे, तर युवकांना राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे ज्ञान मिळावे, तसेच त्यांना ते समाजालाही सांगता यावे, या दृष्टीने वैचारिक अन् बौद्धिक क्षमता यांच्या वृद्धीसाठी अभ्यासवर्गांचेही आयोजन करण्यात आले होते.

१ घ. ‘हिंदु राष्ट्र’विषयीच्या ग्रंथांचे पारायण : ‘हिंदु राष्ट्राची स्थापना ही ज्ञानशक्तीच्या आधारे होईल’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले नेहमी सांगतात. हे लक्षात घेऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेल्या हिंदु राष्ट्राविषयीच्या ग्रंथांचे पारायण करणे, हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश ‘युवांमध्ये हिंदु राष्ट्राविषयी वैचारिक आणि बौद्धिक सुस्पष्टता यावी’, हा होता.

१ च. वार्ता प्रशिक्षण शिबिर : हिंदुत्व, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात देशभरात घडणाऱ्या विविध घटनांचे वृत्तांकन कसे करावे ? ते करतांना काय काळजी घ्यावी ? वृत्तामध्ये कोणती सूत्रे यायला हवीत ? आदींविषयी माहिती देणारे ‘वार्ता प्रशिक्षण शिबिर’ही घेण्यात आले. याचा ५० जणांनी लाभ घेतला.

१ छ. ‘हिंदु राष्ट्रवीर’ बनण्यासाठीची ११ सूत्री ‘आचारसंहिता’ : ‘हिंदवी स्वराज्याच्या कार्यात योगदान देणारे मावळे होते, तसे हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणाऱ्यांना ‘हिंदु राष्ट्रवीर’ म्हणायचे’, अशी संकल्पना आम्ही बनवली. यामध्ये ‘हिंदु राष्ट्रवीर’ बनण्यासाठी ११ सूत्री आचारसंहिता सिद्ध करण्यात आली, उदा. प्रतिदिन साधना करणारा; बलोपासना करणारा; धर्माचरण करणारा; राष्ट्र-धर्मकार्यासाठी वेळ देणारा; हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रसंगी सर्वस्वाचा त्याग करण्याची सिद्धता असणारा आदी. या सूत्रांचे आचरण करील, त्याला ‘हिंदु राष्ट्रवीर’ म्हणता येईल, असे सर्वांना सांगण्यात आले. यानुसार ३०० हून अधिक जणांनी ही आचारसंहिता कृतीत आणायला आरंभ केला.

२. कृतज्ञता

अशाप्रकारे हिंदु युवांचे संघटन करण्यासाठी भगवंताने आमच्याकडून प्रयत्न करून घेतले. यासाठी जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.

– श्री. हर्षद खानविलकर आणि श्री. निरंजन चोडणकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती.