गोव्यात पंचायत निवडणूक १० ऑगस्टला

उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर सरकारकडून निवडणुकीच्या दिनांकाची घोषणा

पणजी, ३० जून (वार्ता.) – मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने ३० जून या दिवशी पंचायत निवडणूक घेण्यासाठी अतिरिक्त ३० दिवस देण्याची सरकारची मागणी फेटाळून लावली. पंचायत निवडणुकीविषयी गोवा खंडपिठाने गोवा सरकारला दुसर्‍यांदा दणका दिला. यानंतर सरकारने तातडीने निर्णय घेत पंचायत निवडणूक १० ऑगस्ट या दिवशी घेण्याचे निश्चित केले आहे. याविषयीची अधिसूचना लवकरच काढली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पंचायत निवडणूक पुढे ढकलण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती. या प्रकरणी न्यायालयाने २७ जून या दिवशी निवाडा देतांना ३ दिवसांत निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करावी, तसेच निवडणूक प्रक्रिया ४५ दिवसांत म्हणजेच १२ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी, असे आदेश दिले आहेत; मात्र सरकारने न्यायालयाकडे निवडणूक घेण्यासाठी अतिरिक्त ३० दिवस देण्याची मागणी केली होती.

 

पंचायत निवडणूक घोषित झाल्यास राज्यात आचारसंहिता लागू होईल आणि ११ आणि १२ ऑगस्ट या दिवशी गोवा विधानसभेचे कामकाज करण्यास अडचण येईल. त्यामुळे न्यायालयाने विनंती स्वीकारावी. ३० दिवस अतिरिक्त मुदत मिळाल्यास १२ सप्टेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी बाजू सरकारच्या वतीने महाधिवक्ता देविदास पांगम यांनी मांडली होती. सरकारची ही मागणी न्यायालयाने फेटाळली.