धाराशिव नामांतराच्या निर्णयाचे शहरात मिठाई वाटून स्वागत !

उस्मानाबाद

धाराशिव – अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ‘उस्मानाबाद’ शहराचे पूर्ववत् ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याचा निर्णय २९ जून या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सामान्य प्रशासन विभागाच्या या निर्णयाला सर्वानुमते संमती देण्यात आल्याचे वृत्त समजताच शहरात मिठाई वाटून निर्णयाचे स्वागत करण्यात आले, तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निर्णयाचे स्वागत केले.

१. भाग्यनगर (हैदराबाद) मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. या वेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, माजी नगराध्यक्ष प्रदीप साळुंके, राजाभाऊ घोडके, तालुकाप्रमुख सतीष सोमाणी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, शहरप्रमुख संजय मुंडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते. तत्कालीन निजाम राजाने वर्ष १९०२ मध्ये त्याचा मुलगा मीर उस्मान अली याचे नाव ‘धाराशिव’ शहराला दिले होते.

२. धाराशिव येथे धारासुरमर्दिनी मातेचे प्राचीन मंदिर असून, तिच्या मंदिरापासून गावाची शीव (गावाची वेस) होती. त्यामुळे ‘धाराशिव’ असे नाव देण्यात आले होते. त्या वेळी जिल्ह्याचे ठिकाण नळदुर्ग होते; मात्र ‘धाराशिव’चे ‘उस्मानाबाद’ नामांतर केल्यानंतर निजामाने जिल्ह्याचा दर्जा दिला. वर्ष १९०२ पासून आतापर्यंत म्हणजे १२० वर्षांनंतरही वयस्कर नागरिक शहराचा ‘धाराशिव’ असाच उल्लेख करतात.

सरकारकडे असलेले पुरावे !

१२० वर्षांनंतर पुन्हा एकदा नावाचा इतिहास पालटला जात आहे. निर्णय घेतांना न्यायालयीन पातळीवर अडचणी येऊ नयेत, यासाठी सरकारने धाराशिव नावासंबंधीचे अनेक पुरावे गोळा केले आहेत. त्यात निजामकालीन ‘गॅझेट’मधील नोंदी, ‘कसबे धाराशिव’ असा उल्लेख असलेले दस्तऐवज, वर्ष १९६२ मध्ये नगरपालिकेने धाराशिव नाव करण्यासाठी घेतलेला ठराव, जुन्या नोंदींचा समावेश आहे. हे दोन्ही पुरावे शासकीय असल्याने ते नामांतरासाठी उपयुक्त ठरले.

‘उस्मानाबाद’ हेच नाव कायम रहाण्यासाठी न्यायालयात जाणार !

मुसलमान समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

आम्ही यापूर्वीही संभाजीनगर न्यायालयात शहराचे नाव ‘उस्मानाबाद’ ठेवण्यासाठी याचिका प्रविष्ट केली होती. त्यात आम्हाला यश मिळाले होते. आताही आम्ही ‘उस्मानाबाद’ हेच नाव रहावे, यासाठी न्यायालयीन लढा लढणार आहोत. समाजबांधवांनी या घटनेचा निषेध करण्याची आवश्यकता नसून शांतता राखावी.