कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या !

कोल्हापूर – यंदा १०४ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दर्शवला होता, त्यामुळे शेतकर्‍यांनी खरिपासाठी जोरदार सिद्धता केली होती. प्रत्यक्षात जून मासात अपेक्षित असा पाऊसच न झाल्यास ५० सहस्र हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात खरिपाचे २ लाख ४ सहस्र हेक्टर कार्यक्षेत्र असून यांपैकी केवळ ४६ टक्के भागात पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५० सहस्र हेक्टर पेरणी अद्याप झालेली नाही.

कृषी खात्याच्या आकडेवारीनुसार ११ दिवसांत केवळ १०० मिलीमीटर पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. जिल्ह्यात नाचणीचे १८ सहस्र हेक्टर क्षेत्र असून त्यांपैकी केवळ १ सहस्र ५२५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पाऊस अल्प झाल्याने सोयाबीनची वाढ खुंटली आहे. पावसाअभावी खरिपाचा हंगाम वाया जातो कि काय ? अशी भीती शेतकर्‍यांना वाटत आहे.