वैष्णवांच्या मेळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन !

संपूर्ण लोणंद नगरी विठ्ठलमय

सातारा, २९ जून (वार्ता.) – संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सायंकाळी ५ वाजता लोणंद (जिल्हा सातारा) नगरीमध्ये अडीच दिवसांच्या मुक्कामासाठी आगमन झाले. लोणंद नगरपंचायत आणि भाविक यांच्या वतीने भक्तीमय वातावरणात माऊलींचे स्वागत करण्यात आले. माऊलींचा पालखी सोहळा पालखी तळावर विसावण्यापूर्वी आरती झाली. या वेळी संपूर्ण लोणंद नगरी विठ्ठलमय झाली.

माऊलींच्या स्वागतासाठी लोणंद नगरीतील लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, शासकीय अधिकारी आणि भाविक बहुसंख्येने उपस्थित होते. पालखी तळावर पालखी आल्यानंतर वारकर्‍यांनी गोलाकार रिंगण करून टाळ-मृदुंगाच्या गजरात भजन म्हणण्यास प्रारंभ केला. पालखी तळावर पोचल्यानंतर आरती झाली. नंतर वारकरी गटागटाने दिंडीतील मुक्कामाच्या ठिकाणी गेले. २ मुक्कामानंतर पालखी सोहळा ३० जून या दिवशी दुपारी १ वाजता तरडगावसाठी प्रस्थान ठेवणार आहे.