जुलै मासात २ सहस्र लोकांसाठी ‘अमरनाथ यात्रे’चे नियोजन ! – शिवाजी (पप्पू) डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य, भाजप, सांगली

सांगली, २८ जून (वार्ता.) – कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली आणि अत्यंत खडतर असलेली अमरनाथ यात्रा सांगलीतून गेली १३ वर्षे चालू असून यंदा हे यात्रेचे १४ वे वर्ष आहे. विशेष करून गोरगरीब, तसेच कष्टकरी वर्गातील जे लोक इच्छा असूनही भोलेनाथाचे दर्शन घेऊ शकत नाहीत, अशांसाठी आम्ही ‘विनामूल्य’ या यात्रेचे नियोजन करतो. जुलै मासात आम्ही २ सहस्र लोकांसाठी ‘अमरनाथ यात्रे’चे नियोजन केले आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा परिषद सदस्य, तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. शिवाजी(पप्पू) डोंगरे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिली.

श्री. डोंगरे या वेळी म्हणाले की,

१. ‘केवळ भोलेनाथच शक्ती देतो आणि तोच हे सर्व करवून घेतो’, हे मी अनेक वर्ष अनुभवत आहे. प्रारंभी केवळ ५० लोकांपासून चालू झालेल्या या यात्रेच्या माध्यमातून आजपर्यंत १५ सहस्र भाविकांना भोलेनाथाचे दर्शन झाले आहे.

२. ९ जुलैपासून गटागटाने आम्ही १५० ते २०० भाविकांना नेण्याचे नियोजन केले असून १२ ते ६५ वर्षे वयोगटातील भाविकांना आम्ही हे दर्शन घडवतो. २२ जुलैपर्यंत २ सहस्र भाविकांना दर्शन घडवण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.

३. सांगली-पुणे, तसेच पुणे येथून जम्मू असा रेल्वेने प्रवास या यात्रेत आहे. एकूण १० दिवसांची ही यात्रा असते. यातील काही लोक पुढे वैष्णोदेवी, तसेच वाघासीमेपर्यंतही जाऊन येतात. यासाठी ‘ऑनलाईन’ नोंदणी करावी लागते.

४. आजपर्यंत यात्राकाळात अनेक अडचणी आल्या; मात्र प्रत्येक वेळी भोलेनाथाच्या कृपेमुळेच त्या सुटल्या. हिंदु म्हणून आपणही आपल्यापरीने या लोकांसाठी काहीतरी केल्याचे समाधान या यात्रेच्या माध्यमातून मला मिळते.