अशीही आणीबाणी !

भारतात २५ जून १९७५ या दिवशी आणीबाणी लावण्यात आली होती. २१ मार्च १९७७ पर्यंत म्हणजे जवळपास पावणेदोन वर्षे ही आणीबाणी लागू करण्यात आली होती. या काळात काँग्रेसच्या विरोधातील राजकीय पक्ष, संघटना, संस्था, नेते आदींवर कारवाई करून संबंधितांना कारागृहात टाकण्यात आले होते. गुंडांवरही कारवाई करण्यात आली होती. वृत्तपत्रांवर ‘सेन्सॉरशिप’ म्हणजे सरकारला प्रत्येक वृत्त आणि लिखाण दाखवून ते छापण्याचे बंधन घालण्यात आले होते. ‘ही आणीबाणी म्हणजे हुकूमशाही होती’, असे विरोधी पक्षांकडून सांगितले जाते. ‘हा भारताच्या इतिहासातील काळा अध्याय होता’, असेही म्हटले जाते. आणीबाणी विविध कारणांमुळे लागू करता येते. देशावर आक्रमण झाल्यास, देशात अंतर्गत उठाव झाल्यास, मोठे आतंकवादी आक्रमण झाल्यास, नैसर्गिक आपत्ती कोसळल्यास आदी कारणांमुळे आणीबाणी लागू करता येते. अमेरिकेत कोरोनाच्या काळात आणीबाणी लावण्यात आली होती. आणीबाणी लावल्यानंतर जनतेवर अनेक बंधने येऊन सरकारला अनेक अधिकार मिळतात. अशीच एक आणीबाणी पाकच्या पंजाब प्रांतात लागू करण्यात आली आहे. पंजाब प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि लहान मुली यांवर बलात्काराच्या घटना घडू लागल्या आहेत. काही मासांपूर्वी एका विदेशी महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. या घटनांवर प्रतिबंध लावण्यासाठी पंजाब प्रांताच्या सरकारने आणीबाणी लावण्याचा निर्णय घेतला. या काळात सामाजिक संघटना, संस्था, राजकीय पक्ष, विचारवंत आदींचे साहाय्य घेऊन यावर उपाय काढण्यात येणार आहे. एरव्ही पाकिस्तानमध्ये काहीही चांगले होत नाही. पाकने जिहादी आतंकवाद मोडून काढण्यासाठी कधी आणीबाणी घोषित केली नाही किंवा अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी, त्यांचा वंशसंहार रोखण्यासाठी पाक सरकारने किंवा पाकच्या एखाद्या प्रांताच्या सरकारने आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला नाही, हे जितके सत्य आहे, तितकेच बलात्कार रोखण्याचा निर्णय घेतला, हे सत्य आहे.

बलात्कारांमागील कारणे

भारतात काँग्रेसच्या काळात बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. तेव्हा अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा किंवा असेही करता येऊ शकते, असा विचार करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून झाला नाही, हेही तितकेच वास्तव आहे. त्यानंतर देशात बलात्कार झाले नाहीत, असे नाही. त्या घटना घडतच आहेत. उत्तराखंडच्या रुरकी येथे चालत्या गाडीमध्ये ६ वर्षांची मुलगी आणि तिची आई यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना २६ जून या दिवशी घडली. अशा घटना भारतियांना लज्जास्पद आहेत. त्यामुळे त्या रोखण्यासाठी पाकच्या पंजाबने ज्या स्तरावर प्रयत्न करण्याचा विचार केला, त्या धर्तीवर भारतातही विचार होणे आवश्यक आहे. बलात्कार होण्यामागील कारणे अनेक आहेत. बलात्कार म्हणजे बलपूर्वक एखाद्याचे शोषण करणे; मात्र भारतातील बहुतांश घटनांत बलपूर्वक ऐवजी संमतीने किंवा आमीष दाखवून अशा घटना घडतात. न्यायालयाने एका प्रकरणात तर ‘महिलेच्या संमतीने शारीरिक संबंध निर्माण झाले असतील, तर नंतर तिने बलात्काराचा केलेला आरोप मान्य केला जाऊ शकत नाही’, असेही म्हटले आहे. याकडेही गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे.

वासनांध धर्मांध !

पाकिस्तान इस्लामी देश आहे; तरीही तेथे शरीयतनुसार न्यायप्रणाली नाही. त्यामुळे बलात्काऱ्यांना चाबकाचे फटके मारणे, त्यांचे हात-पाय कापणे, कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर मरेपर्यंत दगड मारणे आदी शिक्षा दिल्या जात नाहीत. पाकच्या कायद्यानुसार खटले चालवून शिक्षा केली जाते. तेथे बलात्काऱ्याला फाशीची शिक्षा नाही. भारतातही केवळ बलात्कार केल्यामुळे कुणाला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद नाही. पाकमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी बलात्काऱ्याला नपुंसक करण्याची शिक्षा देण्याची मागणी केली होती. अशा प्रकारचे कठोर कायदे केले, तरी बलात्कार मुळापासून थांबणे कठीण आहे. त्याला वर दिलेली कारणे कारणीभूत आहेत. त्यामुळे एकूणच समाजाची स्थिती पालटणे आवश्यक आहे. यासाठी पंजाब प्रांत काय प्रयत्न करणार ? हे पहावे लागेल. दुसरे म्हणजे पाकमध्ये हे चालू असतांना शेजारील तालिबानी अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांकडून महिलांवर अत्याचार होत आहेत. हा विरोधाभास आहे. दोन्ही इस्लामी देश आहेत आणि तेथे बहुसंख्यांक मुसलमान आहेत. ‘बलात्कार करणे इस्लामनुसार योग्य नाही’, असे तालिबानमधील एकही इमाम, मौलवी तालिबान्यांना सांगण्यासाठी पुढे आलेला आहे, असे तरी दिसून आलेले नाही. यापूर्वी इस्लामिक स्टेटचे सीरियातील काही भागावर नियंत्रण आल्यावर तेथेही अशाच घटना घडल्या होत्या.

…तर भारतातही आणीबाणी !

रुरकी येथील घटनेवरून वर्ष २०१३ मध्ये झालेली देहलीतील बसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेची आठवण झाली. देहलीतील घटनेनंतर देशभरात मोठे आंदोलन उभे राहिले होते. त्यानंतर केंद्र सरकारने कायद्यात पालट करून ‘पॉक्सो’ कायदाही बनवला आणि महिलांसाठी ‘निर्भया निधी’ही उपलब्ध करून दिला; मात्र तरीही भारतात महिलांवरील बलात्काराच्या घटना ना न्यून झाल्या, ना थांबल्या. त्यातही ‘लव्ह जिहाद’च्या घटनांत वाढ झाली. भारतात बलात्कार रोखण्यासाठी जनतेवर नैतिकतेचे संस्कार करणे आवश्यक आहे. तसेच दोषींना तितकीच कठोर आणि तात्काळ शिक्षा होणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृती ही संयमाची आहे. हा संयम मिळवण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. ती आता समाजाला शिकवून आणि करवून घ्यावी लागणार आहे. असे केले नाही, तर भविष्यात पाकप्रमाणे भारतातही बलात्कार रोखण्यासाठी आणीबाणी लागू करावी लागली, तर आश्चर्य वाटू नये !

भारतातील बलात्कार रोखण्यासाठी जनतेला साधना शिकवणे आवश्यक !