#Ayurved # आयुर्वेद : रोग टाळण्यासाठी योगाभ्यास करा !

आयुर्वेद काय सांगतो ?

कोणत्या रोगांवर कोणती आसने उपयुक्त ?

भुजंगासन
  • थायरॉइड : शीर्षासन, सर्वांगासन, सिंहमुद्रा, हलासन
  • अपचन : अग्निसार, सर्वांगासन, मयूरासन, हलासन, धनुरासन आणि उड्डियान बंध
  • जननेंद्रियाचे विकार : शीर्षासन, उड्डियान बंध, योगमुद्रा, पश्चिमोत्तानासन, स्वस्तिकासन
  • मलावरोध : वक्रासन, योगमुद्रा, हलासन, शंखप्रक्षालन
  • स्वादुपिंडाचे विकार : मयुरासन, पवनमुक्तासन आणि उड्डियान बंध
  • स्पाँडिलायटिस : मत्स्यासन
  • दमा : कपालभाती, मत्स्यासन
  • पाठदुखी : धनुरासन, भुजंगासन, चक्रासन
  • मासिक पाळीचे विकार : पश्चिमोत्तानासन

आजार झाल्यावर व्यायाम करण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून व्यायाम करावा !

‘म्हातारपणी सांधे दुखणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे इत्यादी आजार झाले की, आधुनिक वैद्य (डॉक्टर) व्यायाम, योगासने इत्यादी करायला सांगतात. येथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजार झाल्यावर व्यायाम करण्यापेक्षा आजार होऊ नये; म्हणून व्यायाम करणे अधिक लाभदायक असते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘पोट सुटणे’ या समस्येपासून मुक्तीसाठी उपयुक्त योगासने !

सेतूबंधासन, चक्की चलनासन, भुजंगासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन, पोटाशी संबंधित विविध आसने, तसेच कपालभाती, अग्नीसार, उड्डीयान या शुद्धीक्रिया, तसेच सर्वांगासन, सूर्यनमस्कार आदी नियमित केल्याने पोटाची चरबी नियंत्रणात रहाण्यास साहाय्य होते.


पुढील आजारांत या प्राणायामांचा चांगला लाभ होतो !

  • वारंवार सर्दी होणे : भस्रिका, उज्जायी (पूरक सहज कुंभक, सरेचक) आणि सूर्यभेदन (रेचक-पूरक)
  • दमा : अनुलोम विलोम (कुंभकरहित)
  • पचनाच्या तक्रारी : सूर्यभेदन
  • शरीर उष्ण असणे : शीतली, चंद्राभ्यास (सहज कुकुंभकासहित)

मधुमेह न होण्यासाठी किंवा बरा होण्यासाठी व्यायाम कसा उपयुक्त आहे, हे जाणा !

मधुमेह न होण्यासाठी किंवा बरा होण्यासाठी व्यायाम कसा उपयुक्त आहे, हे विहिरीच्या उदाहरणावरून समजून घेऊ. विहिरीतील नैसर्गिक झऱ्यांमुळे विहिरीत पाणी येत रहाते; पण एक दिवस पाणी येणे बंद होते. गाळ साठल्याने त्या झऱ्यांची तोंडे बंद होतात. गाळ उपसून विहीर स्वच्छ केली, तर झरे मोकळे होऊन विहीर पुन्हा पाण्याने आपोआप भरते, तसेच आपल्या शरिरातही वेगवेगळे स्राव आपोआप पाझरत असतात. ते काही कारणांनी बंद झाले की, त्यांची न्यूनता जाणवते. रक्तात साखर वाढते; कारण ‘इन्सुलिन’ नावाच्या स्रावाची निर्मिती घटते. ग्रंथींची दारे बंद झाल्याने किंवा त्यात काही अडकल्याने स्रावांची निर्मिती थांबते. ग्रंथी दाबली जात नाही किंवा हालतच नाही; म्हणून हे होते. व्यायामच केला जात नाही; म्हणून ग्रंथी दाबली जात नाही. व्यायाम का होत नाही ? आमच्या अंगात आळस आहे म्हणून.

समजा वाळलेल्या लिंबातून रस काढायचा असेल, तर ते चहूकडून हाताने रगडून, घोटून, फिरवून घ्यावे लागेल. त्याप्रमाणे आपल्याला शरिरातील अग्न्याशय (पँक्रियाज) नावाच्या अवयवातून ‘इन्सुलिन’ नावाचा रस बाहेर काढायचा आहे. मधुमेहामध्ये हे ‘इन्सुलिन’ जेव्हा निर्माणच होत नसेल, तेव्हा या ग्रंथीची सतत हालचाल होणे, या अवयवावर दाब निर्माण होईल, असे काहीतरी करणे अपेक्षित असते. मंडुकासन, पवनमुक्तासन, हलासन, सर्वांगासन, भुजंगासन, मयूरासन, नमनमुद्रा, कपालभाती इत्यादी योगक्रियांमुळे पोटावरील, विशेषतः अग्न्याशय (पँक्रियाज) आणि यकृत (लिव्हर) या दोन अवयवांवर बाहेरून ताण किंवा दाब देता येतो. यामुळे त्यांतून नैसर्गिकपणे चांगल्या पाचक रसांची उत्पत्ती होण्याची शक्यता वाढते. मधुमेह होऊ नये; म्हणून हा अत्यंत सोपा उपाय आहे.

– वैद्य सुविनय दामले, कुडाळ

व्यायामाचे आचार !

सकाळी रिकाम्या पोटी तेलाने मसाज करून व्यायाम करावा. रात्रीच्या झोपेत रक्तात शोषलेले अन्नघटक खर्च होत नाहीत. झोपून उठल्यावर शरिराला जडपणा आलेला असतो. ते घटक नीट पचवून आत्मसात् होण्यासाठी सकाळीच व्यायाम करण्याची आवश्यकता असते. हेमंत आणि शिशिर ऋतूत, म्हणजे थंडीच्या दिवसात व्यायाम केल्याने उष्णता निर्माण होते आणि दिवसभर टिकते. वसंत ऋतूतही शरिरात कफाचा प्रकोप होत असल्याने या काळातही व्यायाम करावा. ग्रीष्म, वर्षा आणि शरद या ऋतूंत अल्प व्यायाम करावा. व्यायामानंतर शरिरास क्लेष होणार नाहीत, अशा प्रकारे अंग रगडून घ्यावे.