१. त्वचाविकारावर औषधोपचार करूनही त्रास न उणावणे, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी आधुनिक वैद्य डॉ. मानसिंग शिंदे यांचे साहाय्य घेण्यास सुचवणे
मला ६ मासांपासून त्वचाविकाराचा त्रास होत आहे. आरंभी माझ्या त्वचेवर पुरळ (‘रॅश’) आले होते आणि नंतर तिथे इसबसारखे (‘एक्झिमा’सारखे) झाले होते. त्यावर औषधोपचार करूनही माझा त्रास उणावला नाही; म्हणून मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना त्याविषयी सांगितले. त्यांनी मला आधुनिक वैद्य डॉ. मानसिंग शिंदे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांच्याशी बोलायला सांगितले.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप आणि औषधोपचार केल्यावर त्रास ५० टक्के न्यून होणे
२१.११.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सद्गुरु गाडगीळकाका यांनी सांगितलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपायासंबंधी एक चौकट प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये विविध व्याधींच्या निवारणासाठी नामजप सांगितले होते. त्यानुसार मी प्रतिदिन एक घंटा माझ्या त्वचारोगासंबंधी ‘गणपति-दत्त-शिव’ असा नामजप करू लागले. मी आधुनिक वैद्यांनी सांगितलेली औषधेही वेळेत घेत होते. ‘मला माझे प्रारब्ध भोगायचे आहे’, हे लक्षात घेऊन मी श्रद्धा ठेवून नामजप करत होते. त्यानंतर माझा त्रास ५० टक्के न्यून झाला.
३. भाव ठेवून औषधोपचार आणि नामजप केल्याने ७५ टक्क्यांहून अधिक प्रमाणात त्रास उणावणे
माझा नामजप भावपूर्ण होत होता. मी औषध घेतांना ‘परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) औषध देत आहेत’, असा भाव ठेवत होते. उपायांची चौकट वाचल्यावर ‘प.पू. गुरुदेवच सद्गुरु काकांच्या माध्यमातून नामजप सांगत आहेत’, असे मला वाटले. आता माझा त्रास ७५ टक्क्यांहून अधिक प्रमाणात उणावला आहे.
त्रास उणावल्यावर मला सद्गुरु गाडगीळकाकांप्रती कृतज्ञता वाटून माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. आपत्काळासारख्या कठीण प्रसंगात संतांनी सांगितलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले. या अनुभूतीसाठी मी परात्पर गुरुदेव आणि सर्व संत यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.
– श्रीमती सौदामिनी कैमल (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८० वर्षे), केरळ (१२.१.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |