चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथील कै. जामराव भावराव पाटील (वय ८५ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे !

चाळीसगाव येथील जामराव भावराव पाटील (वय ८५ वर्षे, सनातनच्या ६८ व्या संत पू. (श्रीमती) केवळबाई पाटीलआजी यांचे पती) यांचे ५.७.२०२१ या दिवशी निधन झाले. आज ज्येष्ठ कृष्ण एकादशी म्हणजे योगिनी एकादशी (२४.६.२०२२) या दिवशी त्यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा श्री. वसंत पाटील यांना वडिलांच्या निधनापूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

कै. जामराव भावराव पाटील

१. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या वडिलांशी झालेल्या भेटीविषयीचा लेख वडिलांच्या निधनापूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणे’, हा ‘त्यांनी वडिलांना दिलेला आशीर्वाद आहे’, असे वाटणे

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि वडील (जामराव भावराव पाटील) यांच्या भेटीविषयीचा लेख वडिलांच्या निधनापूर्वी ४ दिवस आधी सलग ३ दिवस दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाला. त्या वेळी मला वाटले, ‘वडिलांच्या निधनाविषयी परात्पर गुरु डॉक्टरांना ठाऊक असावे; म्हणून तो लेख त्यांच्या निधनापूर्वी ४ दिवस आधी प्रसिद्ध झाला. हा एक चमत्कार आहे आणि गुरुदेवांनी वडिलांना दिलेला आशीर्वाद आहे.’

पू. (श्रीमती) केवळबाई पाटील
श्री. वसंत पाटील

२. वडिलांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

अ. त्यांचा तोंडवळा तेजस्वी आणि हसरा दिसत होता.
आ. ग्रामीण भागात मृत व्यक्तीचे नातेवाईक पुष्कळ रडतात. आम्ही सर्व नातेवाइकांना विनंती केली, ‘‘सर्वांनी न रडता नामजप करूया.’’ त्याप्रमाणे वडिलांच्या निधनानंतर कुणीच रडले नाही.
इ. घरात सतत ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप चालू होता. ‘घरात जणूकाही एखादा मोठा धार्मिक विधी आहे’, असे प्रसन्न वातावरण होते.
ई. वडिलांची अंत्ययात्रा चालू होण्यापूर्वी भगवान श्रीविष्णूला भावपूर्ण सामूहिक प्रार्थना करण्यात आली. अंत्ययात्रेत सहभागी झालेले लोक ‘श्री गुरुदेव दत्त ।’, असा नामजप करत होते. त्या वेळी माझ्याकडून सतत परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त होत होती.
उ. अंत्ययात्रेत सहभागी झालेले गावातील लोक आणि नातेवाईक म्हणाले, ‘‘एखाद्या साधू-महात्म्याच्या मृत्यूनंतर वाटावे, तसे भव्य-दिव्य वातावरण वाटत आहे.’’

गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉक्टरांनी) केलेल्या या कृपेबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. वसंत पाटील (मुलगा), चाळीसगाव, जळगाव. (४.६.२०२२)

(कै.) जामराव पाटील यांना लाभलेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्यावर ‘देव भेटला’, असे वाटणे

‘पू. आई (पू. (श्रीमती) केवळबाई पाटीलआजी) आणि बाबा यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास आरंभ करून १५ वर्षे झाली होती; परंतु त्यांना गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉक्टरांचे) दर्शन झाले नव्हते. ‘गुरुदेवांचे दर्शन व्हावे’, असे त्या दोघांनाही वाटत होते. एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर त्या दोघांना पुष्कळ आनंद झाला आणि ‘देव भेटला’, असे वडिलांना वाटले.

२. वडिलांच्या इच्छेनुसार त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांचे दुसऱ्यांदा दर्शन होणे

गुरुदेवांची भेट झाल्यावर ‘पुन्हा एकदा गुरुदेवांचे दर्शन झाले, तर बरे होईल’, असे वडिलांना वाटले. आम्ही आश्रमातून निघायच्या वेळी गुरुदेवांनी आम्हाला पुन्हा बोलावले आणि वडिलांची आंतरिक इच्छा पूर्ण केली. त्या वेळी वडिलांनी गुरुदेवांना साष्टांग दंडवत घातला. त्या दिवशी ‘जणू ईश्वराने भक्ताला आशीर्वाद दिला’, असे वाटले.

पुढे काही मासांनंतर कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी चालू झाली. ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन होणे’, हे विधिलिखित होते’, अशी आम्हाला अनुभूती आली.

– श्री. वसंत पाटील (मुलगा), चाळीसगाव, जिल्हा जळगाव. (४.६.२०२२)