कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचा १ खासदार, ३ आमदार आणि २ पाठिंबा दिलेले आमदार आहेत. ज्याचे अधिक आमदार, त्या पक्षाकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असे आहे. मी आता तिसर्यांदा आमदार झालो असल्याने मी पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहे, असे उत्तर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आणि राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांना सांगितले.
श्री. राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘कोल्हापूर येथे महायुतीच्या १० पैकी १० जागा येणार’, असे मी सांगितले होते. त्यानुसारच घडले. लोकसभेनंतर हिंदू एकवटले आणि त्यांनी हिंदू एक झाल्यावर काय होते ? ते दाखवून दिले. महाराष्ट्राच्या निवडणुकीत ‘कॉमन मॅन’ (सामान्य मनुष्य) म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा चालला. त्यामुळेच महायुतीचा विजय झाला. तुम्ही निवडून आलात की, ‘इ.व्ही.एम्.’ चांगले आणि हरल्यावर यंत्रावर आरोप करणे हे योग्य नाही. निवडणूक हरल्यामुळेच महाविकास आघाडीकडून बेछूट आरोप केले जात आहेत. यापुढील काळात कोल्हापूर शहरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी मी अग्रक्रमाने प्रयत्न करीन.’’