मिरज येथे माजी आमदार डॉ. एन्.आर्. पाठक स्मृतीदिनानिमित्त आज व्याख्यान आणि शिबिर !

मिरज (जिल्हा सांगली), २९ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील ख्यातनाम धन्वन्तरी, माजी आमदार दिवंगत डॉ. एन्.आर्. पाठक यांच्या ३९ व्या स्मृतीदिनी ३० नोव्हेंबर या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. येथील मुक्तांगण, खरे मंदिर येथे प्रसिद्ध वक्ते आणि पत्रकार सागर देशपांडे यांचे ‘समाजकार्याची नवी दिशा’ यावर व्याख्यान होईल, अशी माहिती ‘पाठक ट्रस्ट’चे अध्यक्ष डॉ. मुकुंदराव पाठक यांनी दिली.

सकाळी ८ वाजता दिवंगत डॉ. पाठक यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून ९ वाजता शिबिर घेतले जाईल. दिवंगत डॉ. पाठक नामांकित वैद्यकीय तज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. रेल्वे जंक्शन, शासकीय रुग्णालय, एस्.टी. डेपो यांविषयीची त्यांनी आंदोलने राज्यभर गाजली होती. आमदार म्हणून त्यांची कारकीर्दही गाजली होती. निरपेक्षपणे काम करणारा समाजसेवक म्हणून ते परिचित होते. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. पाठक यांनी केले.