पुणे शहरामध्ये सध्या तरी शिरस्त्राणसक्ती नाही ! – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

प्रतिकात्मक चित्र

पुणे – विनाशिरस्त्राण दुचाकीस्वार आणि बसलेला सहप्रवासी अशा दोघांवर कारवाई करण्याच्या काढलेल्या आदेशाला सध्या स्थगिती दिली आहे. याविषयी वाहतुकीविषयी असलेले विविध विभाग, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी अशा सर्वांशी चर्चा करून, शिरस्त्राण वापराविषयी जनजागृती केल्यानंतर १ जानेवारी २०२५ पासून कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

वाहतूक विभागातील अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना विनाशिरस्त्राण दुचाकीस्वार आणि सहप्रवाशी यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. त्याला विविध स्तरांतून विरोध होत आहे. त्यामुळे सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

महामार्गांवर शिरस्त्राण बंधनकारक करा ! – आमदार रासने

पुणे शहरामध्ये शिरस्त्राणसक्ती करण्यात येऊ नये. महामार्गांवरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शिरस्त्राण सक्ती करावी, तसे आदेश काढावेत, अशी सूचना भाजपचे आमदार हेमंत रासने यांनी केली.