अमरावती येथे ‘ब्रह्माकुमारीज’च्या वतीने सनातन संस्थेचा सन्मान !

‘सनातन पंचाग – २०२५’ स्वीकारतांना राजयोगी बी.के. संतोषदीदी, समवेत सन्मानप्राप्त सनातनच्या साधिका  सौ. समिधा वरुडकर

अमरावती – रुक्मिणीनगर येथील ‘ब्रह्माकुमारीज’ सेवाकेंद्रात २५ नोव्हेंबर या दिवशी आयोजित कार्यक्रमात समाजसेवेसाठी विविध क्षेत्रांतील संस्था आणि मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ‘सनातन संस्थे’चाही विशेष सन्मान करण्यात आला.

‘ब्रह्माकुमारीज’च्या संयुक्त मुख्य प्रशासिका राजयोगी बी.के. संतोषदीदी,  माऊंट अबू समाज सेवा प्रभाग, अध्यक्ष आणि महाराष्ट्र, आंध्र प्रभाग प्रमुख यांच्या हस्ते, तसेच प्रसिद्ध समाजसेवक श्री. चंद्रकुमार जाजोदिया आणि श्री. गोविंद कासट यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार सोहळा पार पडला.

या सोहळ्यात २० समाजसेवी संस्था आणि समाजसेवक यांचा गौरव करण्यात आला. सनातन संस्थेने अध्यात्म क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची नोंद घेत संस्थेचा विशेष सन्मान करण्यात आला. सनातनच्या साधिका सौ. समिधा वरुडकर यांनी संस्थेच्या वतीने सन्मान स्वीकारला. सनातनचे साधक श्री. रमेश वरुडकर आणि श्री. विलास सावरकर यांनी राजयोगी बी.के. संतोषदीदींना ‘सनातन पंचाग – २०२५’ भेट दिले. कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात पार पडला.