१. योगतज्ञ प.पू. दादाजी यांनी स्वप्नात येऊन साधकाला एका भक्तासाठी दैवी पूजा करण्यासाठी पूजेची सिद्धता करण्यास सांगणे
‘८.२.२०२३ या दिवशी पहाटे ५.१५ वाजता माझ्या स्वप्नात योगतज्ञ प.पू. दादाजी आले होते. तेव्हा स्वप्नात त्यांना पाहून मला आश्चर्य वाटले. माझ्या मनात विचार आला, ‘योगतज्ञ दादाजी यांनी तर देहत्याग केला आहे. मग ते देहरूपात कसे आले ?’ स्वप्नात योगतज्ञ प.पू. दादाजी मला म्हणाले, ‘श्री. अनुदीप दिघे आणि श्री. प्रशांत दिघे (योगतज्ञ दादाजी यांचे भक्त) हे दोघे जण आपल्याकडे येणार आहेत. आज त्यांच्यासाठी पूजा करायची आहे. आतील खोलीत पूजेच्या सिद्धतेसाठी मला घेऊन चल !’’ (भक्तावर कोणतेही संकट आले असेल किंवा येणार असेल, तर त्याच्या निवारणार्थ योगतज्ञ दादाजी संबंधित भक्ताला बोलावून स्वहस्ते त्याच्यासाठी ‘दैवी पूजा’ करत असत. मी नाशिक येथे योगतज्ञ दादाजी यांच्या सेवेत असतांना ते पूजेची पूर्वसिद्धता माझ्याकडून करवून घेत असत.) मी त्यांना त्यांच्या काखेत धरून उठवले आणि आतील खोलीत घेऊन गेलो. खोलीत गेल्यानंतर ते भूमीवर मांडी घालून बसले आणि त्यांनी बाजूच्या कोपर्यातील धुळीने माखलेले ताट बाहेर काढले. ताटावरील धूळ झटकल्यावर ते चांदीचे ताट चमकू लागले. ‘मी रहात असलेल्या खोलीत चांदीचे ताट असल्याचे मला ठाऊक नाही’, याचे मला आश्चर्य वाटले. ‘योगतज्ञ दादाजींना या ताटाविषयी कसे ठाऊक झाले आणि ते ताट तेथे कसे आले ?’, असे प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले. त्यानंतर योगतज्ञ दादाजींनी तेथूनच भक्तांच्या रक्षणाकरता वापरण्यात येणार्या डबीतील साहित्यामधून चांदीचे लॉकेट असलेले सुरक्षाकवच बाहेर काढले. त्यानंतर योगतज्ञ दादाजी मला म्हणाले, ‘‘वरच्या खणामध्ये लाडू आहेत, तेही काढ !’’ लाडूचा डबा उघडल्यावर त्यातून लाडूंचा पुष्कळ स्वादिष्ट सुगंध येत होता. त्या डब्यातून त्यांनी सहा लाढू काढले आणि मला त्या चांदीच्या ताटात ठेवायला सांगितले. मी हे सर्व आश्चर्याने पहात होतो.’
२. स्वप्नात योगतज्ञ दादाजींनी ‘एका भक्ताचा भ्रमणभाष आला का ?’, असे विचारल्यावर त्या भक्ताचा शुभवार्ता देणारा भ्रमणभाष येणे
‘योगतज्ञ दादाजी यांनी देहत्याग केला असतांनाही ते सदेह घरात कसे आले आणि घरात कोठे काय आहे, हे त्यांना कसे ठाऊक ?’, असा मला प्रश्न पडला. त्यानंतर त्यांनी मला दोन वेळा विचारले, ‘‘एका भक्ताचा भ्रमणभाष आला का ?’’ योगतज्ञ दादाजी यांनी एक भक्ताला आध्यात्मिक स्तरावरील उपाय सांगितले होते. त्या व्यक्तीकडून शुभवार्ता येणार होती. त्याच वेळी ‘संबंधित भक्ताचा शुभवार्ता असलेला भ्रमणभाष आला’, असे मला स्वप्नात दिसले.
३. स्वप्नात योगतज्ञ दादाजी यांनी दैवी पूजा केलेल्या भक्ताला साधकाने नंतर प्रत्यक्षात संपर्क करणे, तेव्हा त्या भक्ताने त्याच्या अडचणींच्या संदर्भात योगतज्ञ दादाजींना प्रार्थना केल्याचे सांगणे
प्रत्यक्षात योगतज्ञ दादाजी यांनी देहत्याग केल्यानंतर मला अनेक स्वप्नदृष्टांत दिले आहेत. त्यातील बहुतांश स्वप्ने सत्यात उतरली आहेत. त्यामुळे माझ्या मनात विचार आला, ‘स्वप्नामध्ये योगतज्ञ दादाजी यांनी ज्या भक्तासाठी पूजा केली, त्याला संपर्क करून विचारूया. त्या भक्ताला काहीतरी अडचण असणार; म्हणून योगतज्ञ दादाजी यांनी त्यांच्यासाठी दैवी पूजा केली असणार.’ त्यानंतर मी संबंधित भक्ताला भ्रमणभाष केला आणि मला पडलेले स्वप्न सांगितले. तेव्हा त्यांचा (श्री. अनुदीप दिघे यांचा) भाव जागृत आला. ते मला म्हणाले, ‘‘मी माझी एक अडचण निवारण्यासाठी योगतज्ञ दादाजींना प्रार्थना करत होतो.’’
४. ‘गुरु देहत्यागानंतरही भक्तांच्या हाकेला धावून जातात’, याची ही अनुभूती असल्याचे जाणवणे
या प्रसंगात माझ्या लक्षात आले, ‘गुरु देहत्यागानंतरही भक्तांच्या हाकेला धावून जातात. योगतज्ञ दादाजी यांच्यापर्यंत त्या भक्ताची प्रार्थना पोचून त्यांनी त्याच्यासाठी दैवी पूजा केली.’ विशेष म्हणजे माझे आणि श्री. अनुदीप दिघे यांचे भ्रमणभाषवर बोलणे चालू असतांना पू. शरदकाका (योगतज्ञ दादाजी यांचे सुपुत्र) मला भ्रमणभाषद्वारे संपर्क करत होते. ज्या वेळी मला असे स्वप्नदृष्टांत होतात, त्या वेळी त्याच्या सत्यतेची प्रचीती (निश्चिती) योगतज्ञ दादाजी मला पू. शरदकाकांच्या माध्यमातून (त्यांचा भ्रमणभाष येणे इत्यादी माध्यमातून) देतात. याची अनुभूती मी अनेकदा घेतली आहे.
या प्रसंगात माझ्या मनात योगतज्ञ दादाजी यांचे सूक्ष्मातील कार्य पाहून कृतज्ञताभाव दाटून आला.’
– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|