रामनाथी (गोवा), १८ जून (वार्ता.) – पोर्तुगीज राजवटीतील फ्रान्सिस झेवियरने ‘इन्क्विझिशन’द्वारे हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. वर्ष १५४१ मध्ये पोर्तुगिजांनी गोव्यातील १२ व्या शतकातील सप्तनाथ मंदिर पाडून तेथील एक खांब गावाच्या मुख्य ठिकाणी आणून ठेवला. त्यावर प्राचीन कन्नड भाषेत ‘दयाज्ञ’ असे कोरलेले आहे. तेथे धर्मांतर न करणार्या हिंदु महिलांना बांधून त्यांचा हात कापले जात. त्यामुळे त्याला ‘हातकातरो खांब’ असे म्हटले जाते.
गोवा स्वतंत्र झाल्यावर इतिहासाची साक्ष देणारा हा खांब हटवून तेथे म. गांधींचा पुतळा उभारण्यात आला आणि खांब दुर्लक्षित ठिकाणी ठेवला. हिंदु जनजागृती समिती स्थानिक हिंदुत्वनिष्ठांच्या साहाय्याने हे सरकारच्या निदर्शनास आणून देऊन त्याची उभारणी केली. जुने गोवे येथील ५०० वर्षे जुने चर्च संरक्षित केले जाते; परंतु १२ व्या शतकातील खांब संरक्षित केला जात नाही, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात दिली.
श्री. शिंदे पुढे म्हणाले, ‘‘गोवा क्रांतीदिनी जुने गोवे येथील ‘हातकातरो’ खांबाच्या (inquisition pillar) ठिकाणी आज हिंदु जनजागृती समिती तसेच स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी एकत्र येऊन श्रद्धांजली वाहिली. या प्राचीन खांबाचे संवर्धन होण्यासाठी ‘हातकातरो खांब संवर्धन समिती’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीद्वारे खांबाचे चांगल्या प्रकारे संवर्धन व्हावे, त्या ठिकाणी माहिती देणारा फलक लिहून पुढील पिढीला हा इतिहास कळावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.’’