वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत असूनही गोळीबाराचा उच्चांक गाठलेल्या अमेरिकेला संस्कार आणि धर्मशिक्षण यांची असणारी आवश्यकता !

१. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये १८ वर्षीय विद्यार्थ्याने १९ कोवळ्या मुलांना गोळीबारात ठार करणे

टेक्सासच्या युवालडे शहरात सालवाडोर रामोस या हायस्कूलमध्ये शिकणारा १८ वर्षीय विद्यार्थी २५ मे २०२२ या दिवशी घरातून रायफल घेऊन निघाला. तत्पूर्वी त्याने त्याच्या ‘इंस्टाग्राम’वर रायफल आणि हँडगन यांचे छायाचित्र ‘स्टेटस’वर ठेवले. आजी त्याला म्हणाली, ‘‘बाळा, काहीतरी खाऊन जा.’’ तेव्हा त्याने पहिला गोळीबार आजीवर केला. त्यानंतर तो तेथील ‘रॉब एलिमेंट्री’ या शाळेत गेला. तेथे त्याने लहान मुले आणि विद्यार्थी यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्याने इयत्ता २ री ते ४ थी मध्ये शिकणाऱ्या १९ मुलांचे प्राण घेतले. त्यांच्यासमवेत २ शिक्षकही त्याच्या गोळीबाराचे बळी ठरले.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

२. अमेरिकेने ४ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित करणे

इतक्या लहान मुलांना मारायचे काय कारण ? त्यांनी मारेकऱ्याचे काय बिघडवले होते ? आज अमेरिकेत विज्ञानाने प्रचंड प्रगती केली असून त्यात ‘इंटरनेट’ची उपलब्धता आहे. दुसरीकडे नवी पिढी संस्कारांपासून वंचित आहे. त्यांच्यातीलच काही माथेफिरू मुले ‘इंटरनेट’वरून नवनवीन युक्त्या शिकून त्याचा वापर करतात. वरील घटनेत मुलगा थेट शाळेत गेला आणि विद्यार्थ्यांवर गोळीबार करत राहिला. शेवटी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा ‘एफ.बी.आय.’ने (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने) पोलिसांसह शाळेला वेढा घातला. त्यांनी सर्वप्रथम आक्रमणकर्त्या मुलाला ठार मारले. त्या आक्रमणात विद्यार्थ्यांसह शाळेतील अनेक कर्मचारी आणि पोलीस घायाळ झाले. प्रशासनाने आक्रमणकर्त्याची आजी आणि अन्य घायाळ यांना रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. शाळेतील परिस्थिती अतिशय भयानक होती. इयत्ता २ री ते ४ थी मधील मुले साधारणत: ६ ते १० वर्षे वयोगटातील आहेत. त्यांचे पालक शाळेसमोर आल्यावर त्यांनी मोठ्याने आक्रोश केला. जे या आक्रमणातून सुदैवाने वाचले, त्यांच्या आई-वडिलांसाठी तर आभाळच ठेंगणे झाले. अमेरिकेने घडलेल्या प्रकारामुळे ४ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला.

३. अमेरिकेतील मुलांना धर्मशिक्षण देणे काळाची आवश्यकता !

गोळीबार आणि आक्रमण ही काही अमेरिकेतील पहिलीच घटना नाही. तेथे सामान्य मुले किंवा व्यक्ती कधी पबमध्ये गोळीबार करतात, तर कधी निग्रो किंवा काळ्या लोकांची गळा दाबून हत्या केली जाते. याला अनेक कारणे आहेत. अशा कृत्यांमागे हिंसक खेळ हे कारण असल्याचे वर्ष २०१९ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. विज्ञानाने प्रगती केली हे सर्व खरे आहे; पण आज अमेरिका महासत्ता आहे. त्यांच्याकडे अमाप पैसा आहे. त्यांनी त्यांच्या नागरिकांना वेळेचा सदुपयोग कसा करावा ? याचे संस्कार दिलेले नाहीत, याचा हा परिणाम आहे. यावरून प्रत्येक ठिकाणी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे, हेच प्रतिबिंबित होते.

४. अन्य देशांना उपदेश देणाऱ्या अमेरिकेत एका वर्षात गोळीबारामुळे ४५ सहस्र लोक मृत्यूमुखी पडणे

अमेरिका सकाळ-संध्याकाळ इतर देशांना उपदेशाचे डोस पाजत असते; पण त्यांच्या देशात अतिशय भयावह स्थिती आहे. गेली काही मास आणि वर्षे कुठे ना कुठे गोळीबार होतच असतो. अलीकडे तर संकेतस्थळांवरून अशी माहिती मिळते की, जेवढे सैनिक अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यात (वर्ष १७७६ मध्ये) ठार झाले नव्हते, त्याहून अधिक लोक वर्ष १९६८ ते २०१७ या काळात मृत्यू पावले. संकेतस्थळ सांगते, ‘दीड दशलक्ष लोक गोळीबारात मृत्यू पावले. केवळ वर्ष २०२० मध्ये अमेरिकेमध्ये ४५ सहस्र लोक गोळीबारात मृत्यू पडले.’ मध्यंतरी २ वर्षांच्या कोविडच्या काळात तेथील मुलांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. अमेरिकेचे पोलीस किंवा गुप्तचर यंत्रणा ‘एफ.बी.आय.’च्या मते अलीकडेच ३४५ वेळा गोळीबार झाला असून त्यात ६२४ हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले, तर १ सहस्र ८०० लोक घायाळ झाले आहेत.’

श्रीकृष्णार्पणमस्तु !

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय. (२६.५.२०२२)