सातारा नगरपालिकेची ४.५ कोटी रुपयांची देयके थकित !

पालिकेत ठेकेदारांची गर्दी; पालिकेच्या तिजोरीत खडखडाट

सातारा, १३ जून (वार्ता.) – करवसुलीचा वेग मंदावल्यामुळे नगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. त्यामुळे ठेकेदारांची देयके काढतांना लेखा विभागाला प्रचंड कसरत करावी लागत आहे. ठेकेदारांच्या गर्दीमुळे पालिका कार्यालयाला बाजाराचे स्वरूप आले आहे. ठेकेदारांनी दिलेल्या माहितीनुसार ४.५ कोटी रुपयांची देयके थकित आहेत.

वर्ष २०२२-२३ ची करवसुली ४२ कोटी रुपयांची आहे; मात्र आतापर्यंत केवळ १६ कोटी रुपयांची वसुली झाली असून अद्याप २६ कोटी रुपयांचा अनुशेष भरून काढणे प्रलंबित आहे. सातारा नगरपालिकेसाठी वेगवेगळ्या प्रस्तावांच्या माध्यमातून सक्रीय असून त्यांची ४.५ कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. देयकांच्या प्रकरणांमध्ये बाह्य हस्तक्षेप वाढल्यामुळे पालिकेकडून २-३ टप्प्यांमध्ये देयके दिली जात असल्याची ओरड ठेकेदार करत आहेत. करवसुली, गाळ्यांचा लिलाव आदींविषयी धोरणात्मक निर्णय झाल्यास पालिकेच्या उत्पन्नात भर पडेल; मात्र याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पालिकेच्या तिजोरीत खडखडाटच आहे.

संपादकीय भूमिका

  • कोट्यवधी रुपयांची देयके थकित का राहिली ? याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. देयके वसूल करून संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !