मुलीला साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन साधनेत साहाय्य करणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे दुर्ग (छत्तीसगड) येथील श्री. हेमंत कानस्कर (वय ५५ वर्षे) !
ज्येष्ठ शुक्ल द्वादशी (११.६.२०२२) या दिवशी भिलाईनगर (दुर्ग, छत्तीसगड) येथील श्री. हेमंत कानस्कर यांचा ५५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांची मुलगी कु. शर्वरी हेमंत कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे) हिला तिच्या वडिलांनी साधनेत केलेल्या साहाय्याविषयी पुढे दिले आहे.
श्री. हेमंत कानस्कर यांना ५५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. वडिलांनी योग्य दृष्टीकोन देऊन चुकांची तत्त्वनिष्ठपणे जाणीव करून देणे
घरी असतांना काही प्रसंगांमध्ये माझ्या मनाचा संघर्ष होऊन माझी चिडचिड होते. तेव्हा बाबा स्थिर राहून मला समजावून सांगतात आणि योग्य दृष्टीकोन देतात. माझ्या मनाचा संघर्ष होईल असा प्रसंग घडल्यास ते मला ‘कसे प्रयत्न करायला पाहिजेत ?’, याविषयी मार्गदर्शन करतात. असा प्रसंग पुन्हा घडल्यावर ‘माझ्या मनाला खंत वाटावी’, यासाठी ते मला कठोर शब्दांत माझ्या चुकीची जाणीव करून देतात. त्यामुळे मला माझ्या चुकीची त्वरित जाणीव होते आणि ‘योग्य काय असायला हवे ?’, हे लक्षात येते. बाबांनी केलेल्या साहाय्यामुळे माझे ‘चिडचिड करणे आणि राग येणे’, हे स्वभावदोष हळूहळू न्यून झाले.
२. वडिलांनी दिलेल्या योग्य दृष्टीकोनांमुळे घरी असतांनाही व्यष्टी साधनेचे प्रयत्न होणे
घरी असतांना काही वेळा माझ्याकडून व्यष्टी साधनेकडे दुर्लक्ष होत असे, तसेच भ्रमणभाषचा अधिक वेळ अनावश्यक वापर होत असे. हे माझ्या बाबांच्या लक्षात आल्यावर बाबा मला समजावून सांगायचे, ‘‘शर्वरी, तू आश्रमात पुष्कळ दिवस राहून तिथे शिकून आली आहेस. तू तिथे जसे वागत होतीस, तसेच येथेही वागायला पाहिजे. ‘अशा अनावश्यक कृतींमुळे तुझा किती वेळ वाया जात आहे ?’, हे तुझ्या लक्षात येते का ?’’ बाबांनी सतत असे समजावून सांगितल्यामुळे घरी असतांना गुरुदेवांच्या कृपेने माझ्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न होऊ लागले.
३. साधकांनी कौतुक केल्यावर ‘मनात अहंचे विचार येऊ नयेत’, यासाठी वडिलांनी लगेच सतर्क करणे
अ. काही वेळा माझ्याकडून सेवा चांगली झाल्यावर साधक माझे कौतुक करायचे. तेव्हा बाबा लगेच मला प्रेमाने समजावून सांगायचे, ‘‘शर्वरी, मनात कुठलाही अहंचा विचार येऊ देऊ नकोस. आपण सतत कृतज्ञतेच्या भावात रहायचे आहे; कारण ही सेवा तू केली नसून देवाने तुझ्याकडून करवून घेतली आहे.
आ. साधनेत प्रगती होण्यासाठी जेवढा वेळ लागतो, त्यापेक्षा अल्प वेळात आपली साधनेत घसरणही होऊ शकते. त्यामुळे तू सतत शिकण्याच्या स्थितीत रहायचा प्रयत्न कर. साधकांनी कौतुक केल्यावर आपण परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.’’
४. एका विषयात अल्प गुण मिळाल्यावर न रागावता साधनेसाठी प्रोत्साहित करणे
इयत्ता नववीमध्ये एका विषयात मला अल्प गुण मिळाले. तेव्हा बाबा मला म्हणाले, ‘‘गुण अल्प मिळाले, तरी काही अडचण नाही. तू उत्तीर्ण झालीस ना ? त्यासाठी कृतज्ञता व्यक्त केलीस का ? आपल्याला लवकर आश्रमात जायचे आहे. त्यासाठी तू सिद्धता चालू केलीस का ? तेथे गेल्यावर आपल्याला चांगली साधना आणि सेवा करायची आहे.’’
बाबांनी प्रत्येक वेळी सतर्क करून माझ्या साधनेला पूरक दृष्टीकोन दिल्यामुळे मला गुरुदेवांची कृपा अनुभवता आली. ‘गुरुदेवांच्या कृपेने मला एवढे चांगले बाबा मिळाले आणि त्यांच्यातील गुण अनुभवता आले’, यासाठी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !
– कु. शर्वरी कानस्कर (मुलगी, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा (२८.४.२०२२)