परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त साजऱ्या झालेल्या ‘रथोत्सवा’च्या वेळी आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. ‘रथोत्सवापूर्वी ३ दिवसांपासून रथोत्सवाच्या वेळी कोणतेही विघ्न येणार नाही’, याची मला आतूनच निश्चिती आणि दृढ श्रद्धा होती.

२. रथोत्सवाच्या दिवशी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सौ. अमृता देशपांडे

२ अ. ‘जगन्नाथाची यात्रा आहे’, असे वाटणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मला रथोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली. रथोत्सवात अनवाणी चालायचे होते. त्या वेळी ‘ही जगन्नाथाची यात्रा आहे आणि प्रत्यक्ष गुरुमाऊलीच (परात्पर गुरु डॉक्टरच) तिच्या बाळांना (साधकांना) घेऊन जात आहेत’, असे मला वाटले.

२ आ. तीनही गुरूंना एकत्र पाहून ‘प्रत्यक्ष श्रीमन्नारायण रथयात्रेला निघाला आहे’, असे वाटून अंतःकरण भरून येणे : रथात परात्पर गुरु डॉक्टरांसह त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ बसल्या होत्या. या तीनही गुरूंना एकत्र पाहून ‘प्रत्यक्ष श्रीमन्नारायण यात्रेला निघाला आहे’, असे वाटून माझे अंतःकरण भरून आले.

२ इ. मोरगाव येथील श्री गणेशाच्या ‘चारद्वार’ यात्रेची आठवण होणे : रथोत्सवाच्या वेळी मला श्री गणेशाची आठवण झाली. मोरगाव येथील श्री गणेशाची ‘चारद्वार’ यात्रा असते. ‘गणेशाने रथयात्रेच्या माध्यमातून ती ‘चारद्वार’ यात्रा माझ्याकडून करवून घेतली’, असे वाटून मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

२ ई. ‘निसर्गदेवता शरणागतभावाने परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी लीन होत आहे’, असे जाणवणे : प्रारंभी ‘रथोत्सवात प्रत्यक्ष गुरुराया (परात्पर गुरु डॉक्टर) असणार आहेत’, हे मला ठाऊक नव्हते; पण जेव्हा मला याविषयी कळले, तेव्हा ‘प्रत्यक्ष निसर्गच ज्या परब्रह्माची आतुरतेने वाट पहात आहे, त्याच्या रथोत्सवात तो विघ्न कसे आणील ?’, असे मला वाटले. ‘निसर्गाचे संचालन ज्यांच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) हातात आहे, त्यांच्या रथोत्सवात निसर्गदेवताही शरणागतभावाने त्यांच्या चरणी लीन होत आहे’, असे मला जाणवले.

२ उ. ‘रथोत्सवात चालतांना प्रत्येक पावलागणिक माझ्या अनंत जन्मांतील पापांचे क्षालन होत आहे’, असे मला वाटले.

२ ऊ. अन्य वेळी माझ्या डोळ्यांत भावाश्रू येतात; पण या वेळी मी शांती अनुभवत होते. माझ्या अंतर्मनात केवळ ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप एका लयीत होत होता.

२ ए. साधकांची भावजागृती झालेली पाहून शरिरावर रोमांच येणे : ‘प्रत्यक्ष श्रीमन्नारायण ‘गुरु’ म्हणून साधकांच्या जीवनात आले आहेत. साधक किती भाग्यवान आहेत !’, याची मला जाणीव झाली. साधकांच्या मनात गुरुरायांप्रती अपार भाव आहे. तो भाव साधकांच्या डोळ्यांतून वहाणाऱ्या भावाश्रूंच्या माध्यमातून व्यक्त होत होता. साधक भावाश्रू थांबवू शकत नव्हते. हे पाहून माझे मन आनंदून गेले. साधकांची भावजागृती झालेली पाहून माझ्या शरिरावर रोमांच आले.

२ ऐ. रथोत्सवात चालतांना ‘निसर्ग आणि सृष्टी आनंदाने गुरुरायांचे स्वागत करत आहे’, असे मला जाणवले.

२ ओ. माझे अंतःकरण भावमय झाले होते. भगवंता, या वेळी मला प्रथमच ‘भाव आणि शांती’ यांची अनुभूती एकाच वेळी घेता आली, ती केवळ तुझ्या कृपेमुळे !

२ औ. ‘या क्षणापर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यासाठी किती केले आणि करत आहेत !’, याची जाणीव होऊन मला कृतज्ञता वाटत होती.

३. ‘रथाने ज्या मार्गावरून मार्गक्रमण केले, तो मार्गही पावन झाला आहे’, असे वाटणे

रथोत्सवानंतर त्या मार्गावरून जातांना ‘या मार्गावरून प्रत्यक्ष भगवंत स्थूल रूपात रथात बसून आला होता. त्यामुळे हा मार्गही पावन झाला आहे’, असे वाटून माझा भाव जागृत होतो. अजूनही आश्रमात ये-जा करतांना मला रथोत्सवाचे ते भावक्षण आठवून माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होते.

‘हे गुरुराया, ‘केवळ आपल्या कृपेमुळे मला हे सर्व अनुभवता आले. आपणच मला रथोत्सवात सहभागी होण्याची संधी दिलीत’, त्याबद्दल मी आपल्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. अमृता विशाल देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.५.२०२२)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक