सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी ४ सहस्र रुपये स्वीकारतांना तलाठ्यांना अटक !

राजगुरुनगर (पुणे) – सातबाराच्या उताऱ्यामध्ये नोंद घालण्यासाठी शेतकऱ्याकडून ४ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना खेड तालुक्यातील वाडा विभागातील तलाठी सुजीत अमोलिक यांना राजगुरुनगर येथील कार्यालयात रंगेहात पकडले. तालुक्यातील वाळद येथील भूमी खरेदी-विक्रीनंतर होणाऱ्या नोंदी घालण्यासाठी एका शेतकऱ्याकडून तलाठी सुजीत यांनी ५ सहस्र रुपये लाच मागितली आणि नोंद केली होती; परंतु ठराविक मुदतीत पैसे न दिल्यामुळे तलाठी त्या शेतकऱ्याला संपर्क करून त्रास देत होते. पैसे नाही दिले, तर ‘केलेली नोंद रहित करू’, अशी धमकीही देत होते. शेवटी त्यांच्या त्रासाला कंटाळून संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

संपादकीय भूमिका

छोट्या छोट्या कामांसाठीही पैसे मागणारे अधिकारी कठोर शिक्षेस पात्र आहेत. तळागाळातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी कुणी लाच मागितल्यास लाच देऊ नका, लगेचच तक्रार करा !