१ लाख २५ सहस्र अवैध नळांची माहिती सिद्ध !
संभाजीनगर – समांतर जलवाहिनी योजनेचा कारभार पहाणाऱ्या ‘संभाजीनगर वॉटर युटिलिटी आस्थापना’चा महापालिका समवेतचा करार वर्ष २०१८ मध्ये रहित झाला आहे. त्याच वेळी शहरात १ लाख २५ सहस्र अवैध नळजोडणीची माहिती आस्थापनाने महापालिकेकडे दिली आहे. ही जोडणी नेमकी कोणत्या भागात आहे, याचीही माहिती दिली आहे; पण ६ जून या दिवशी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतलेल्या झाडाझडती बैठकीत महापालिका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीच नाही. (यावरून महापालिका अधिकाऱ्यांचे अवैध नळ जोडणी घेणाऱ्यांशी लागेबंधे आहेत का ? याची पडताळणी करून दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे. – संपादक) त्यामुळे केंद्रेकर यांनी अवैध नळजोडणी सर्वेक्षणासाठी अधिकाऱ्यांना ८ दिवसांची मुदत दिली आहे. अवैध नळ घेणाऱ्यांवर ३० जूननंतर गुन्हे नोंद करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यात कुचराई करणाऱ्यांना निलंबित केले जाईल, अशी चेतावणी त्यांनी दिली.
या वेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय सिंग यांनी इंदिरानगर येथे मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात अवैध नळ घेतले आहेत, असे सांगितले. यावर महापालिका पाणीपुरवठा विभागप्रमुख हेमंत कोल्हे यांना यासाठीच्या कारवाईविषयी उत्तर देता आले नाही. ‘अधिकाऱ्यांना अवैध नळांविषयी माहिती नाही’, असे होऊच शकत नाही, अशी टिपणी केंद्रेकरांनी केली. (याच्या मुळाशी जाऊन नेमके काय झालेले आहे ? हे शोधून काढावे आणि संबंधितांवर कारवाई करावी. – संपादक)