पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी संत गजानन महाराजांच्या पालखीचे ६ जून या दिवशी सकाळी ७ वाजता शेगावहून प्रस्थान झाले. गजानन महाराजांच्या पालखी वारीचे हे ५३ वे वर्ष आहे. वारीचा एकूण ७५० किलोमीटरचा पायी प्रवास असून, यात ७०० वारकरी सहभागी आहेत. वारीचा बुलढाणा, अकोला, वाशिम, परभणी, धाराशिव, बीड, जालना, सोलापूर या ८ जिल्ह्यांतून एकूण ५९ दिवसांचा प्रवास असणार आहे.
दळणवळण बंदीमुळे मागील २ वर्षांच्या कालखंडानंतर संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघाली आहे. गेल्या वर्षी शेगाव संस्थानचे कार्यकारी विश्वस्त शिवशंकर पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव निळकंठ (दादा) पाटील यांनी विधीवत् पूजा, आरती करून पालखीला प्रस्थानासाठी शुभेच्छा दिल्या. मोठ्या उत्साही आणि चैतन्यदायी वातावरणात गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.