संभाजीनगर येथे १० सहस्र रुपयांची लाच घेतांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यास अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेला सार्वजनिक बांधकाम विभाग !

संभाजीनगर – सेवानिवृत्तीनंतर शासकीय निवासस्थान सोडतांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यासाठी १० सहस्र रुपयांची लाच घेतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक (वर्ग ३) मनोज नरवडे यांना १ जून या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून अटक केली. ७४ सहस्र ६८२ रुपयांची वसुलीची रक्कम रहित करण्यासाठी त्यांनी २० सहस्र रुपये मागून तक्रारदाराचे काम अडवून ठेवले होते. (लाचखोरी नष्ट करण्यासाठी संबंधितांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक ! – संपादक)

शासकीय तंत्रनिकेतन येथून कार्यदेशक पदावरून ३१ ऑगस्ट २०२१ या दिवशी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याने याविषयी तक्रार दिली होती. ते कुटुंबासह कोटला कॉलनी येथील शासकीय निवासस्थानात वास्तव्यास होते. निवृत्तीनंतर त्यांनी निवासस्थान सोडले; मात्र नियमाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तसे कळवून घर रिक्त केल्याचा अहवाल आणि वसुली रक्कम असल्यास ती भरावी लागते. त्यानंतर त्याचे प्रमाणपत्र मिळते. त्यासाठी तक्रारदाराने मनोज नरवडे यांच्याकडे सातत्याने पुरवठा केला; परंतु त्यांनी लाच मागितली.