रामनाथी (गोवा) – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या अनमोल सत्संगात स्वतःला घडवणारे आणि देहभान विसरून अन् तळमळीने सेवा करणारे सनातनचे साधक श्री. स्नेहल राऊत (वय ३६ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंददायी घोषणा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी २८ मे या दिवशी एका सत्संगात केली. श्री. स्नेहल यांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या वार्तेने त्यांच्या सहसाधकांनाही आनंद झाला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आणि सप्तर्षींच्या आज्ञेने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देश-विदेशांत अखंड प्रवास करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासह दैवी प्रवासातील ध्वनीचित्रीकरणाची सेवा श्री. स्नेहल राऊत हे करतात.
या सत्संगात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, तसेच श्री. स्नेहल राऊत यांची पत्नी सौ. समृद्धी राऊत, मोठे भाऊ श्री. मेहुल राऊत, पुतण्या कु. आदित्य, सासरे श्री. वीरेंद्र मराठे, तसेच श्री. स्नेहल यांचे सहसाधक आदी उपस्थित होते. श्री. स्नेहल राऊत यांची आई सौ. अंजली राऊत, वडील श्री. मनोहर राऊत आणि मोठे भाऊ श्री. राहुल राऊत, तसेच सासूबाई सौ. वृंदा मराठे हे दूरभाषद्वारे सत्संगाला उपस्थित होते.
अशी झाली आनंददायी घोषणा !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मुखातून निघणारे अमृतमय शब्द, त्यातून पाझरणारे ज्ञान आणि भक्तीचा रस प्राशन करण्याची संधी त्यांच्यासमवेत सेवा करणार्या दौर्यातील साधकांना मिळते. त्यांच्या सहवासातील अनमोल क्षणमोती अनुभवण्यासाठी एका सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक शानभाग आणि श्री. स्नेहल राऊत यांनी त्यांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या सहवासात शिकायला मिळालेली अनेक वैविध्यपूर्ण सूत्रे सांगितली. तेव्हा श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी अलगदपणे श्री. स्नेहल यांच्याकडून सेवा करतांना होत असलेले साधनेचे प्रयत्न एका काव्यातून उलगडले अन् श्री. स्नेहल हे जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली. या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री. स्नेहल राऊत यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला.
गुरुकृपा असल्यामुळे ‘माझे जीवन व्यर्थ जाणार नाही’, याची निश्चिती वाटते ! – श्री. स्नेहल राऊत
अ. ‘माझी प्रगती व्हावी’, ही अपेक्षाच मी सोडून दिली; पण ‘माझ्यावर गुरूंची कृपा असल्यामुळे कोणत्याही स्थितीत ‘माझे जीवन व्यर्थ जाणार नाही’, हे मात्र निश्चित आहे’, असे मला वाटायचे. ‘गुरुसेवेत तन-मनासहित झिजायचे आहे’, असेच मला वाटते. सर्वकाही गुरुच करतात. ‘मी केवळ माध्यम आहे आणि मला केवळ माध्यम बनूनच रहायचे आहे, ही जाणीव सतत राहू दे’, अशी गुरूंना प्रार्थना होते.
आ. इतरांशी सहजतेने बोलता येण्यासाठी श्री. विनायक शानभाग यांनी मला साहाय्य केले. आम्हाला साहाय्य करणार्या जिज्ञासूंना गुरूंच्या कार्याशी जोडून ठेवण्याच्या दृष्टीने विनायकदादा मला त्यांच्या संपर्कात रहाण्यास सांगतात. यातून ‘इतरांशी अनौपचारिक कसे बोलावे’, हे शिकायला मिळाले.
इ. काही हितचिंतक आम्हाला एखाद्या सेवेसाठी स्वत:हून संपर्क करत, तेव्हा लक्षात यायचे की, ‘सनातन आणि माताजी (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) ही नावे आपल्या पाठीशी आहेत; म्हणून सर्व होत आहे.’
ई. चित्रीकरणासाठी लागणार्या साहित्याच्या खरेदीसाठी अभ्यास करण्याची सेवा करू लागल्यापासून माझे मन – बुद्धी त्याच विचारांत राहू लागले. सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपतांनाही तेच आठवते.’’
श्री. स्नेहल यांनी कठोर श्रम करून ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा टप्पा स्वत:कडे खेचला ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
अ. तहानभूक विसरून सेवा करत स्वतःची १०० टक्के फलनिष्पत्ती देणे : चित्रीकरणासाठी लागणारे साहित्य मिळवण्यामागे स्नेहलच्या प्रयत्नांचे चैतन्य आहे. त्याच्या प्रयत्नांतून भगवंतच चित्रीकरणाच्या साहित्याच्या माध्यमातून उभा राहिला आहे. त्याने तहान-भूक विसरून सेवा करत स्वतःची १०० टक्के फलनिष्पत्ती दिली आहे. त्याने सेवेसाठी दुकानांमध्ये नुसत्या फेर्या मारल्या नाहीत, तर साधनेसहित त्या कृती केल्या. कठोर श्रम करून श्री. स्नेहल यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा टप्पा स्वत:कडे खेचला आहे.
आ. ‘कर्म आपलेपणाने केल्यामुळे श्री. स्नेहलही भगवंताचे आवडते असणे : आम्ही दौर्याच्या वेळी ज्यांच्या घरी रहातो, तेथे भाजी चिरणे, रांगोळी काढणे, केर काढणे अशा सर्वच सेवा तो करतो. त्याच्यात पुरुषी अहं नाही. तो सर्वांचा झाला; म्हणून भगवंताचा आवडता झाला. ब्रह्माकडे जाण्यासाठी प्रत्येक कर्म आपलेच वाटायला हवे. ते स्नेहलने केले.
‘गुरूंना अपेक्षित सेवा कशी करावी ?’ याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे श्री. स्नेहल ! – श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ
अ. चित्रीकरणाच्या साहित्याच्या खरेदीचा अभ्यास करण्याची सेवा स्नेहल करत आहे. तेव्हापासून त्याच्यात नेतृत्वगुण वाढला. या सेवेद्वारे देवाने स्नेहलला इतरांशी संवाद साधण्याची संधी दिली आहे.
आ. ‘‘गुरूंना अपेक्षित सेवा कशी करावी ?’ याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे श्री. स्नेहल ! स्वत:मध्ये दैवी गुण वाढवणे, त्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न करणे, सेवा करतांना विविध प्रसंगांमध्ये साधनेचे दृष्टीकोन ठेवणे हे सर्व स्नेहलने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. ‘आपण गुरूंचे प्रतिनिधी आहोत’, या भावाने ‘कुठेही गेलो, तरी प्रतिसाद मिळणारच’, ही श्रद्धाही शिकायला मिळते.
इ. श्री. स्नेहलप्रमाणे ‘देहभान विसरून सेवा होते का ?’, ‘गुरूंमुळेच सर्वकाही होते ?’, असा भाव असतो का ?’, याचे साधकांनी चिंतन करावे.
चार मासांत श्री. स्नेहल यांची आध्यात्मिक पातळी २ टक्क्यांनी वाढली ! – सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ
‘मागील ४ मासांत श्री. स्नेहलची आध्यात्मिक पातळी २ टक्क्यांनी वाढली. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या दैवी दौर्यात वापरण्यात येणार्या वाहनाच्या संदर्भातील लेख प्रकाशित झाला होता. या लेखातील स्नेहलच्या छायाचित्रातून मला प्रकाश बाहेर पडतांना दिसला होता. त्याचे कारण आता कळले.’
‘भावनाशीलतेतून तत्त्वनिष्ठता’, असे मोठे परिवर्तन त्यांच्यात झाले आहे ! – सौ. समृद्धी राऊत (पत्नी)
‘श्री. स्नेहल यांचा स्वभाव मूळात भावनाशील आहे; पण आता भावनाशीलतेतून तत्त्वनिष्ठता’, असे मोठे परिवर्तन त्यांच्यात झाले आहे. प्रवासात त्यांची सेवा चालू असतांना मी कधी दूरभाष केला, तर ‘आता सेवेत आहे, रात्री बोलूया’, असे ते सांगतात. ‘या वेळी ते गोवा येथे आल्यावर मला आणि अन्यही बर्याच साधकांना श्री. स्नेहल यांच्या तोंडवळ्यामध्ये पुष्कळ सकारात्मक पालट जाणवले.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |