डॉम्निकचे अड्डे आणि त्याचे सर्व आर्थिक व्यवहार यांचे अन्वेषण करावे !

गोव्यातील राष्ट्रीय बजरंग दलाची मागणी

राष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा प्रमुख नितीन फळदेसाई

पणजी, २८ मे (वार्ता.) – डॉम्निक करत असलेल्या धर्मांतराच्या प्रकरणात निष्पक्ष कारवाई अपेक्षित असून डॉम्निक याचे अन्य ठिकाणी असलेले अड्डे शोधून काढून त्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच त्याचे सर्व आर्थिक व्यवहार यांचे अन्वेषण केले जावे, अशी मागणी राष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा प्रमुख नितीन फळदेसाई यांनी केली. २८ मे या दिवशी राष्ट्रीय बजरंग दलाच्या शिष्टमंडळाने गोव्याचे पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी निवेदन सादर केले.

या वेळी नितीन फळदेसाई म्हणाले, ‘‘डॉम्निक याच्या माध्यमातून ज्यांचे धर्मांतर करण्यात आले आहे, त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणण्यासाठी राष्ट्रीय बजरंग दल संपूर्ण व्यवस्था करणार आहे. ज्यांना हिंदु धर्मात परत यायचे आहे. त्यांनी संपर्क केल्यास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.’’

‘बिलिव्हर्स’च्या माध्यमातून धर्मांतर करणार्‍या डॉम्निक डिसोझा

‘बिलिव्हर्स’च्या माध्यमातून धर्मांतर करणार्‍या डॉम्निक डिसोझा याला गजाआड करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा शब्द पाळला, त्याबद्दल समाधान व्यक्त करून फळदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

राष्ट्रीय बजरंग दलाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

डॉम्निकची निंदनीय वागणूक पहाता आज ना उद्या त्याच्यावर कारवाई करणे आवश्यकच होते. अनेकांनी डॉम्निक आणि त्याच्या सहकार्‍यांच्या विरोधात शासन, प्रशासन, पोलीस आदींकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. डॉम्निकच्या कृती आणि तो हिंदूंच्या विरोधात करत असलेल्या चिथावण्या यांमुळे समाजातील वातावरण बिघडले आहे. हिंदूंच्या देवतांचा अनादर करणे, ही तर त्याची सवयच बनली आहे.

योग्य अधिकर्‍यांकरवी डॉम्निकची कसून चौकशी करण्यात यावी, तसेच त्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना पूर्ण पाठींबा द्यावा. यामुळे डॉम्निकचा खरा चेहरा उघड होईल, तसेच यात सहभागी असलेले त्याचे सहकारीही उघड होतील. त्यामुळे या प्रकरणाकडे वरवर न पहाता कसून चौकशी करण्यात यावी. त्याच्या सहकार्‍यांवरही डॉम्निकप्रमाणेच गुन्हे नोंद करण्यात यावेत.