परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महर्षींप्रती असलेला शिष्यभाव आणि महर्षींचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती ‘श्रीमन्नारायणाचे अवतार’ म्हणून असलेला आदरभाव !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाच्या संदर्भात घडलेली सुंदर निसर्ग लीला !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. पाऊस पडत असल्याने महर्षींनी सांगितलेला रथोत्सवाचा दिनांक पुढे ढकलण्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना विचारायला सांगणे; पण त्यानंतर ‘तसे करणे म्हणजे महर्षींवर अविश्वास दाखवल्यासारखे होईल’, असे वाटल्याने त्यांनी महर्षींची त्रिवार क्षमा मागणे

१ अ. १८.५.२०२२ या दिवशी ‘गोव्यात पुढे २ दिवस विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडणार आहे’, अशी दैनिकात बातमी असल्याने आणि त्याप्रमाणे पाऊस पडल्याने ‘२२ मे या दिवशी महर्षींनी सांगितलेला रथोत्सवाचा दिनांक पुढे ढकलता येईल का ?’, असे विचारावे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात येणे : ‘२२.५.२०२२ या दिवशी माझी जन्मतिथी होती. त्या दिवशी माझा रथोत्सव करावा’, असे महर्षींनी ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’द्वारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून मला कळवले होते. १७.५.२०२२ या दिवशी गोव्यात पुष्कळ पाऊस पडला.  १८.५.२०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये गोव्यात पुढे २ दिवस विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडणार आहे आणि या वेळी वारे वेगाने वहाणार आहेत’, अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. २०.५.२०२२ या दिवशी गोव्यात खूप पाऊस पडला आणि वादळी वारेही वहात होते. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘२२ तारखेला असेच झाले, तर जन्मोत्सवाची रथयात्रा काढता येणार नाही; म्हणून आपण ‘महर्षींना रथोत्सवाचा दिनांक पुढे ढकलता येईल का ?’, असे विचारावे.’ त्याप्रमाणे त्यांना कळवण्यासाठी मी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना कळवले.

१ आ. ‘महर्षींनी सांगितलेला रथोत्सवाचा दिनांक पुढे ढकलण्याविषयी त्यांना विचारणे, म्हणजे त्यांच्यावर अविश्वास दाखवणे होईल’, असे वाटून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी महर्षींची त्रिवार क्षमा मागणे : त्यानंतर तासाभराने माझ्या मनात विचार आला, ‘असे कळवणे म्हणजे ‘जे महर्षि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आतापर्यंत ७ वर्षे सतत मार्गदर्शन करत आहेत, त्यांच्यावर विश्वास नसणे’, असे होईल. त्यापेक्षा जे होईल, ते साक्षीभावाने पहावे.’ तेव्हा वाटले, ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांना आधीच कळवले असल्यास ‘तसे कळवल्याबद्दल त्यांना ‘मी त्रिवार क्षमा मागितली आहे’, असे कळवावे.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.५.२०२२)

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेला महर्षींप्रतीचा शिष्यभाव, आज्ञापालनाचे महत्त्व, त्यांची अहंशून्यता आणि नम्रता !

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

वरील संदर्भात मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा भ्रमणभाष आला, त्या वेळी ते म्हणाले, ‘‘माझ्याकडून एक मोठी चूक झाली आहे. महर्षींना आपण ‘रथोत्सवाचा दिनांक पुढे ढकलूया का ?’, असे विचारणे म्हणजे त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. अध्यात्मात आज्ञापालनाला पुष्कळ महत्त्व आहे. येथे तर साक्षात् महर्षि आपल्याला सांगत आहेत. आपण नेहमी शिष्यभावातच असले पाहिजे. महर्षींना त्रिवार सांगा, ‘क्षमा, क्षमा, क्षमा !’’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा भ्रमणभाष येऊन गेल्यावर माझे आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे बोलणे झाले, ‘यातून ईश्वर आपल्याला काहीतरी शिकवत आहे. गुरुदेव साक्षात् श्रीमन्नारायण असूनही ते महर्षींची क्षमा मागत आहेत, तर आपण किती नम्र असले पाहिजे. केवढी ही गुरुदेवांची  अहंशून्यता ! यातून शिकायला मिळते, ‘एकीकडे गुरुदेव रथोत्सवाच्या संदर्भात समष्टीचाही विचार करत आहेत आणि महर्षींचे आज्ञापालन करणेही शिकवत आहेत.’ आपल्याला आज्ञापालन म्हणून गुरुदेवांचा निरोप महर्षींपर्यंत पोचवायचा आहे आणि महर्षि अन् गुरुदेव या दोघांचेही आज्ञापालन करायचे आहे.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे सप्तर्षींना विचारल्यावर त्यांनी सांगितलेली सूत्रे

३ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या मनात पावसाचा विचार आला, म्हणजे ‘त्या दिवशी पावसाचे संकट येणार आहे’, असेच ते सुचवत आहेत ! : ‘गुरुदेवांच्या मनात आलेला विचार आणि गुरुदेवांनी महर्षींच्या चरणी त्रिवार क्षमा मागितल्याविषयी आम्ही ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’चे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना सांगितले. पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी लगेच नाडीपट्टी उघडली आणि तिचे वाचन केले. तिच्यात लिहिले होते, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् नारायणच आहेत. त्यांच्या मनात येणारा विचार आणि प्रश्न हे कल्याणकारीच असतात. त्यांच्या मनात कोणताही निरर्थक विचार येत नाही. त्यांनी सप्तर्षींकडे क्षमायाचना केली, म्हणजे आपण कुठे तरी न्यून पडत आहोत. ‘श्रीमन्नारायणाचा हा रथोत्सव होणे’, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. गुरुदेवांच्या मनात पावसाचा विचार आला, म्हणजे ‘त्या दिवशी पावसाचे संकट येणार आहे’, असेच ते सुचवत आहेत.

३ आ. ‘पाऊस येऊ नये’, यासाठी सर्वांनी आर्ततेने श्रीमन्नारायणालाच प्रार्थना करूया ! : सप्तर्षी, सर्व संत आणि सगळे साधक मिळून गुरुदेवांनाच शरण जाऊया अन् त्या श्रीमन्नारायणालाच प्रार्थना करूया. आपण आर्ततेने प्रार्थना करून श्रीमन्नारायणाला आळवूया. रथोत्सवाची वेळ दुपारी ४ ते सायंकाळी ६.३०, अशी आहे; पण आता आपण त्या वेळेत पालट करूया. जेवढ्या लवकर रथोत्सव चालू करता येईल, तेवढ्या लवकर तो चालू करूया. आपल्या सर्वांची प्रार्थना श्रीमन्नारायण ऐकतीलच ! रथोत्सवाला आरंभ होण्यापूर्वीही आपण गुरुदेवांना प्रार्थना करूया.’

४. परात्पर गुरु डॉक्टरांनी सप्तर्षींची सूत्रे ऐकून ‘छान झाले !’, असे म्हणणे आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘या प्रसंगातून आम्हाला पुष्कळ शिकायला मिळाले’, असे सांगणे

दुसऱ्या दिवशी मी गुरुदेवांना सप्तर्षींनी सांगितलेली सर्व सूत्रे सांगितली. ती सूत्रे ऐकून गुरुदेव हसले आणि ‘छान झाले !’, असे म्हणाले. तेव्हा मी गुरुदेवांना म्हणाले, ‘‘या प्रसंगातून आम्हाला पुष्कळ शिकायला मिळाले. ‘सप्तर्षी देवाचा मान कसे राखतात आणि देवही सप्तर्षींचा मान कसा राखतो ?’, हे आम्हाला सप्तर्षी अन् गुरुदेव यांच्या संभाषणातून शिकायला मिळाले.’’

५. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या रथोत्सवाच्या दिवशी पावसाचे संकेत असतांनाही पाऊस न पडणे’, ही श्रीमन्नारायणाने केलेली अद्भुत निसर्गलीलाच !

५ अ. सप्तर्षीं, संत आणि सर्व साधक यांनी श्रीमन्नारायणाला प्रार्थना करणे अन् रथोत्सवाच्या दिवशी पावसाचे ढग दिसेनासे होऊन सर्वत्र सुंदर सूर्यप्रकाश पसरणे : २१ आणि २२ मे २०२२ या दिवशी सर्व साधकांनी श्रीमन्नारायणाला ‘निसर्ग अनुकूल राहू दे. रथोत्सवात पाऊस आणि वारा यांचा त्रास होऊ नये’, अशी प्रार्थना केली. रथोत्सवाच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता आणि दुसरीकडे रथोत्सवाची सिद्धता तेवढ्याच उत्साहाने चालू होती. रथोत्सवाच्या दिवशी सकाळी ६ वाजल्यापासून आकाश स्वच्छ झाले होते. पावसाचे ढग दिसेनासे होऊन सर्वत्र सुंदर सूर्यप्रकाश पसरला होता.

५ आ. ‘रथोत्सव संपल्यावर पाऊस येणार असल्याने संध्याकाळी ६ च्या आत रथोत्सव संपवून रथ रामनाथी आश्रमाच्या आत न्यायला हवा’, असे सप्तर्षींनी सांगणे : दुपारी ३ वाजता रथोत्सवाला आरंभ होणार होता. रथोत्सवाच्या दिवशी सकाळी सप्तर्षींचा निरोप आला, ‘श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांनी आपल्या सर्वांची प्रार्थना ऐकली आहे. निसर्ग अनुकूल झाला आहे. पावसाचे ढग पूर्ण गेले नसून गुरुदेवांनी ते साधकांच्या दृष्टीक्षेपापासून दूर नेऊन ठेवले आहेत. रथोत्सव संपल्यावर लगेच हे ढग परत येतील आणि पाऊस येईल. आपल्याला संध्याकाळी ६ च्या आत रथोत्सव संपवून रथ रामनाथी आश्रमाच्या आत न्यायला हवा.’

५ इ. अशी अनुभवली श्रीमन्नारायणाची निसर्गलीला !

५ इ १. रथोत्सव निर्विघ्नपणे पार पडून परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या खोलीत गेल्यावर हलकासा पाऊस येणे आणि यामागील सप्तर्षींनी सांगितलेला कार्यकारणभाव : रथोत्सवाच्या दिवशी आकाश स्वच्छ होते. त्या दिवशी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. संपूर्ण रथोत्सवात पावसाचा एक थेंबही पडला नाही; उलट सर्वत्र ऊन होते. सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे रथोत्सव संध्याकाळी ६ च्या आत पूर्ण झाला. गुरुदेव रथातून उतरल्यावर पुष्पार्चना झाली आणि ते त्यांच्या खोलीत गेले. गुरुदेव खोलीत गेल्यानंतर लगेचच आश्रमाच्या परिसरात हलकासा पाऊस पडायला आरंभ झाला. त्या वेळी श्रीमन्नारायणाची अपरंपार लीलाच अनुभवता आली.

याविषयी सप्तर्षींना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘जसे मोठ्या मैदानातील कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांना त्यांच्या गाड्या कार्यक्रमस्थळापासून दूर थांबवाव्या लागतात, त्याप्रमाणे श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांनी ढग रथोत्सवाच्या परिसरापासून दूर थांबवले होते. ‘रथोत्सव कधी संपतो आणि आपण कधी गती पकडतो ?’, याची जणू ते वाट पहात होते. ही सर्व श्रीमन्नारायणाची निसर्गलीलाच होती.

५ इ २. यातून लक्षात आले, ‘गुरुदेवांचा पंचमहाभूतांवर केवढा अधिकार आहे. ते निसर्गालाही नियंत्रित करू शकत आहेत आणि म्हणूनच ते श्रीमन्नारायणाचे अवतार आहेत !’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२४.५.२०२२)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या मंगलमय रथोत्सवाच्या वेळी सर्व सृष्टीच भगवंताच्या सगुण रूपाच्या दर्शनाची वाट पहात असल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

कु. सुप्रिया जठार

‘रथोत्सवाच्या आदल्या दिवसापर्यंत पावसाळा चालू झाल्यासारखा पाऊस पडत होता; पण रथोत्सवाच्या दिवशी सकाळपासून ऊन होते. यावरून वाटले की, निसर्गाला भगवंताचे दर्शन घ्यायचे होते; म्हणून निसर्गानेच वातावरण अनुकूल केले.

गुरुमाऊलींच्या कृपेमुळे मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली. मार्गावरून चालत असतांना असे जाणवत होते की, हा रस्ता अनेक वर्षांपासून भगवंताच्या दर्शनासाठी व्याकुळ होता. वृक्ष-वेली, पशू-पक्षी, ढग, आकाश अशी सर्व सृष्टीच भगवंताच्या सगुण रूपाच्या दर्शनासाठी अनेक वर्षांपासून वाट बघत होती. आज परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाल्यामुळे सर्व सृष्टी आनंदी झाली. मार्गावरून चालत असतांना पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता. काही पक्षांचे थवे आनंदाने उडत होते. व्याकुळ असलेला तो रस्ताही आनंदी झाला होता. ‘भगवंताच्या या दर्शनामुळे सजीव-निर्जीव वस्तू, तसेच सृष्टीतील प्रत्येक घटकाचे मन तृप्त झाले’, असे मला जाणवले. दुपारी ३.३० ते ४ वाजताही थंड वाऱ्याची झुळूक येत होती. तेव्हा मला वाटले की, वारासुद्धा या माध्यमातून त्याचा आनंद व्यक्त करत आहे. हीसुद्धा गुरुमाऊलींचीच कृपा !

‘गुरुमाऊली, आपल्या कृपेमुळेच ही अनुभूती आली, त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’

– कु. सुप्रिया सतीश जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.५.२०२२)    

आनंददायी ‘रथोत्सवा’च्या वेळी आलेल्या अनुभूती

१. रथोत्सव चालू होण्यापूर्वी झालेला शंखनाद ऐकतांना ‘साक्षात् भगवान श्रीकृष्ण शंखनाद करत आहे आणि आकाशातून पुष्पवृष्टी होत आहे’, असे वाटणे : ‘२२.५.२०२२ दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आनंददायी ‘रथोत्सवा’त आम्ही सर्व साधक एका रांगेत उभे होतो. रथोत्सव चालू होण्याआधी शंखनाद करण्यात आला. शंखनाद ऐकून ‘साक्षात् भगवान श्रीकृष्ण शंखनाद करत आहे आणि आकाशातून पुष्पवृष्टी होत आहे’, असे मला वाटले.

२. ‘आम्ही सर्व साधक प्रत्यक्ष वैकुंठलोकातील आनंद अनुभवत आहोत’, असे वाटून माझा भाव जागृत झाला.’

– सौ सुविधा रमेश फडके, शिवनाथी , शिरोडा , गोवा (२२ .५ .२०२२)

टिप – परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘मी अवतार आहे’, असे म्हटलेले नाही. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले,  श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे भगवंताचे अवतार आहेत’, असे महर्षींनी नाडीपट्टीत सांगितले आहे. ‘सनातन प्रभात’च्या संपादकांचा महर्षींप्रती भाव असल्यामुळे आम्ही या विशेषांकात लिखाण प्रसिद्ध करत आहोत. – संपादक