|
काय आहे प्रकरण ?कामाच्या वेळेत हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू पावलेले साहेबराव सरोदे यांची पत्नी कमलाबाई, मुलगा सचिन आणि मुलगी अश्विनी यांनी ट्रकमालक सुरेश राजपूत आणि ‘युनायटेड इंडिया इन्शुरन्स आस्थापना’च्या विरुद्ध अधिवक्ता संदीप राजेभोसले यांच्या वतीने सादर केलेल्या अर्जाच्या सुनावणीअंती कामगार न्यायालयाने हा आदेश दिला. साहेबराव हे राजपूत यांच्या ट्रकवर चालक होते. त्यांना सलग १५ घंटे ट्रक चालवावा लागत होता. या ताणामुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला आहे, असा त्यांच्या वारसांचा दावा होता. न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वारसांकडून करण्यात आलेला युक्तीवाद ग्राह्य धरत वारसांना हानीभरपाई देण्याचे आदेश दिले. |
संभाजीनगर – ‘एखादा कामगार काम करत असलेल्या ठिकाणी त्याला हृदयविकाराचा झटका आल्यास तो अपघात आहे’, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा कामगार हानीभरपाई आयुक्त तथा कामगार न्यायालयाच्या न्यायाधिशांनी एका खटल्यात २५ मे या दिवशी दिला आहे. यासंबंधी अर्जदाराचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरला आहे. मृत वाहनचालक साहेबराव सरोदे यांची पत्नी आणि वारस यांना ट्रकमालक अन् विमा आस्थापन यांनी संयुक्तिकरित्या ६ लाख ७७ सहस्र ७६० रुपये १२ टक्के व्याजासह हानीभरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे, तसेच ट्रकमालकाला न्यायालयाने ३ लाख ३८ सहस्र ८८० रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याने सरोदे यांच्या अंत्यविधीचा व्यय म्हणून ५ सहस्र रुपये आणि अर्जाच्या व्ययापोटी ५ सहस्र रुपये प्रतिवादींना देण्याचाही आदेश दिला आहे.