सांगली शहर ‘यलो सिटी ब्रँडिंग’ करण्याचे निश्चित !

सांगली, २२ मे (वार्ता.) – सांगलीच्या हळदीचा पिवळा रंग अतिशय उच्च आहे. याच हळदीवरून सांगली शहर ‘यलो सिटी ब्रँडिंग’ करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेनुसार सांगली महापालिकेच्या इमारतींपासून या मोहिमेस प्रारंभ होणार आहे. सांगलीमध्ये यापुढे बांधली जाणारी कोणतीही इमारत असो वा शासकीय कार्यालय ती पिवळ्या रंगातच होईल. नागरिकांनीही नवीन इमारत बांधतांना या संकेताचे पालन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. सांगली जिल्ह्यात हळद, ऊस, डाळिंब, द्राक्ष ही प्रमुख नगदी पिके आहेत. येथील हळदीला १०० पेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. हळदीचा वायदे बाजार सांगलीतून चालू झाला. सांगली ही देशातील हळदीची प्रमुख बाजारपेठ आहे.