सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीत सनातनच्या तीन गुरूंविषयी काढलेले गौरवोद्गार !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

सनातन संस्थेचे तीन गुरु, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ! सनातनच्या साधकांना लाभलेले हे ईश्वरी धन आहे. सनातनच्या या तीन गुरूंची महती सनातनचे संत, साधक, धर्मप्रेमी, ईश्वरनिष्ठ कलाकार आणि धर्मनिष्ठ अधिवक्ता यांच्याही लक्षात आली आहे; मात्र ती महती ऋषीलोकातील ऋषींच्या ओघवत्या वाणीतून ऐकतांना किंवा वाचतांना साधकांची श्रद्धा अधिक दृढ होते. सनातनच्या ३ गुरूंच्या सामर्थ्याची अनुभूती साधकांनी आजपर्यंत पदोपदी घेतली आहे. त्याचे यथार्थ शब्दांकन महर्षींनी लक्षावधी वर्षांपूर्वीच नाडीपट्टीच्या माध्यमातून केले आहे. सप्तर्षींनी नाडीपट्टीमध्ये सनातनच्या ३ गुरूंविषयी वेळोवेळी काढलेले गौरवोद्गार आज आपण जाणून घेऊया.

१. सप्तर्षींनी सप्तर्षी जीवनाडीपट्टीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी वेळोवेळी काढलेले गौरवोद्गार !

सनातनचा ‘रामनाथी’ आश्रम

१ अ. ‘तिरुपती’च्या व्यंकटेशाप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले हे गोव्यातील एका डोंगरावर विराजमान असणे : ‘तिरुपति येथे श्रीनिवासाचा (श्री बालाजीचा किंवा श्री व्यंकटेशाचा) अवतार होऊन ३ सहस्रांपेक्षा अधिक वर्षे झाली. परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् श्रीनिवासाचे रूप आहेत. गोवा येथील सनातनचा ‘रामनाथी’ आश्रम हा आताच्या कलियुगातील ‘तिरुपति’ आहे. साधकांनी तिरुपतीला वेगळे जाण्याची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे श्री व्यंकटेश ‘तिरुपती’च्या डोंगरावर उभा आहे, त्याप्रमाणे श्रीविष्णूचा अवतार असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले ‘रामनाथी’, गोवा येथे एका डोंगरावर विराजमान आहेत.’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्रमांक १३८ (१७.२.२०२०))

१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले हे स्वयं परब्रह्मस्वरूप असून त्यांच्या प्रत्येक अवतारामध्ये सप्तर्षी त्यांच्या समवेत असणे : ‘शंखचक्रधारी श्रीमन्नारायणाचा अवतार असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी सप्तर्षींचे त्रिवार वंदन ! ज्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या समवेत पांडव होते, श्रीरामाच्या समवेत वानर होते, त्याप्रमाणे आता गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) समवेत सनातनचे साधक आहेत. श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद, श्री अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज या चार गुरूंच्या नंतर आलेले परात्पर गुरु डॉ. आठवले हे स्वयं परब्रह्मस्वरूप आहेत. प्रत्येक अवतारामध्ये नाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षी तुमच्या समवेत होते. श्रीकृष्णाच्या समवेत सुदामा होता, तसे आम्ही सप्तर्षीं गुरुदेवांच्या समवेत आलो आहोत.’ (सप्तर्षीं जीवनाडीपट्टी वाचन क्र. १४५ (१७.५.२०२०))

१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले पृथ्वीच्या आध्यात्मिक सिंहासनावर विराजमान असणे : ‘श्रीविष्णूने त्रेतायुगात श्रीरामाच्या रूपात क्षत्रिय कुळात जन्म घेतला आणि द्वापरयुगात श्रीकृष्णाच्या रूपात यादव कुळात जन्म घेतला. आताच्या कलियुगात श्रीविष्णूने ‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले’ यांच्या रूपात जन्म घेतला आहे. सध्या गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) संपूर्ण पृथ्वीच्या आध्यात्मिक सिंहासनावर विराजमान आहेत. साक्षात् भगवंत पृथ्वीवर आला, तर तो कसा दिसेल ? तो ‘परात्पर गुरु डॉ. आठवले’ यांच्यासारखाच दिसेल.

नाडीपट्टी वाचन करतांना पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी

१ इ १. प्रत्येक १ सहस्र वर्षांनी भगवान श्रीविष्णु पृथ्वीवर अवतार धारण करत असणे : प्रत्येक १ सहस्र वर्षांनी भगवान श्रीविष्णु पृथ्वीवर अवतार धारण करतो. तेव्हा पृथ्वीवर असलेल्या लोकांना त्याच्याविषयी कळेलच, असे नाही. गेल्या १ सहस्र वर्षांनंतर भगवंताने ‘गुरुदेव डॉ. आठवले’ (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या रूपात जन्म घेतला आहे. गुरुदेवांचा जन्म ‘अयोनी संभव’ आणि प्रकाशरूपात झाला आहे. सध्या वैकुंठातील विष्णु संपूर्ण पृथ्वीकडे गुरुदेवांच्या दोन डोळ्यांच्या माध्यमातून बघत आहे.’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १४६ (१.६.२०२०))

१ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्म केवळ धर्मसंस्थापनेसाठी झाला असणे : ‘श्रीमन्नारायणाचा अवतार असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्म केवळ धर्मसंस्थापनेसाठी झाला आहे. धर्मसंस्थापनेला विरोध करणाऱ्या पाताळातील मोठ्या वाईट शक्ती गुरुदेवांना अनेक प्रकारे त्रास देत आहेत. आतापर्यंत मोठ्या वाईट शक्तींनी गुरुदेवांना त्रास देण्यासाठी योजलेल्या सर्व युक्त्या निष्फळ झाल्या आहेत आणि पुढेही त्यांचे नियोजन निष्फळ होईल. एक दिवस वाईट शक्ती हरतील आणि परात्पर गुरु डॉ. आठवले धर्मसंस्थापना, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना करतील.’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९३ (२३.११.२०२१))

२. सप्तर्षींनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

२ अ. ‘पृथ्वीवर अनेक आश्रम आहेत; मात्र सनातनचा आश्रम सोडून अन्य कुठेही श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासारख्या दैवी स्त्रिया नाहीत !’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९० (२१.१०.२०२१))

२ आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोघींच्या भोवती एक तेजोवलय असणे : ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोघींच्या भोवती नेहमी एक प्रकाशमय आध्यात्मिक वलय असते. ते वलय कोटी सूर्य प्रकाशासारखे तेजस्वी आहे. हे वलय सूक्ष्म असल्याने सर्वसामान्य लोकांना कळणे कठीण आहे. पुढे अनेक सात्त्विक लोक या दोन्ही माताजींना पाहून त्यांना शरण जातील.

श्री. विनायक शानभाग

२ इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दैवी शक्ती आणि दैवी सौंदर्य असलेल्या दैवी स्त्रिया आहेत ! : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव, भक्ती, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षता हे गुण आहेत. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दैवी शक्ती आणि दैवी सौंदर्य असलेल्या दैवी स्त्रिया आहेत. त्यामुळे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोघी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी झाल्या आहेत.’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९३ (२३.११.२०२१))

– श्री. विनायक शानभाग, चेन्नई, तमिळनाडू. (८.५.२०२२)

२ ई. सनातनच्या तीन गुरूंचा जन्म केवळ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी झालेला असणे : ‘सध्या संपूर्ण देशाला वाईट शक्तींनी त्यांच्या कह्यात घेतले आहे. पूर्वीचे हिंदु राजे कसे होते आणि आताचे राजे (राजकारणी) कसे आहेत ? ईश्वरी राज्य येण्यासाठी आपल्याला पुष्कळ प्रयत्न करावे लागणार आहेत. सनातनच्या तीन गुरूंचा जन्म वाईट शक्तींशी सूक्ष्मातील युद्ध करणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे यांसाठीच झाला आहे. पुढे हिंदु राष्ट्र आल्यावर लोकांना वाटेल, ‘हे सर्व राजकारण्यांमुळे झाले’; मात्र ‘सनातनच्या तीन गुरूंमुळे हिंदु राष्ट्र आले’, हे मानवजातीला कळायला थोडा वेळ लागेल. पृथ्वीवरील अन्य लोकांचा जन्म केवळ त्यांचे प्रारब्ध भोगणे आणि कुटुंबियांशी असलेला त्यांचा देवाण-घेवाण हिशोब संपवणे यांसाठी झाला आहे; मात्र सनातनच्या तीन गुरूंचा जन्म ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेसाठीच झाला आहे.

२ उ. सनातनच्या तीन गुरूंवर असंख्य वाईट शक्ती अगणित आक्रमणे करत असूनही त्या त्यांना त्रास देऊ न शकणे; कारण सनातनच्या तीन गुरूंचे शरीर वज्रासारखे असणे : ‘मोठ्या वाईट शक्तींनी सनातनच्या तीन गुरूंवर सूक्ष्मातून एवढ्या मोठ्या संख्येत वाईट शक्ती सोडल्या आहेत की, त्यांची संख्या कोणीही मोजू शकत नाही. असे असूनही त्या तिन्ही गुरूंचे शरीर नष्ट करू शकत नाहीत. प्रतिदिन एवढ्या मोठ्या संख्येने होणाऱ्या सूक्ष्मातील आक्रमणांचा तिन्ही गुरूंच्या शरिरावर केवळ खरचटल्यासारखा परिणाम दिसून येतो. यावरून ‘सनातनच्या तिन्ही गुरूंचे शरीर वज्रासारखे आहे’, हे लक्षात येते.’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९५ (२०.१२.२०२१))

२ ऊ. साधकांच्या रक्षणासाठी सूक्ष्मातील मायावी शक्तींशी सतत लढणारे सनातनचे तीन गुरु ! : ‘मायावी आणि मोठ्या अशा पाताळांतील वाईट शक्तींनी अनेक प्रयत्न केल्यावर सनातनच्या त्या तीन गुरूंच्या केवळ स्थूल शरिराला थोडा त्रास देऊ शकत आहेत. त्यामुळे साधकांना वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे तीन गुरूंच्या शरिरावर होणारे परिणाम दिसतात. ते दिसले नसते, तर सनातनच्या सहस्रो साधकांना ‘तीन गुरु साधकांसाठी वाईट शक्तींशी कसे लढत आहेत ?’, हे कळले नसते. आम्ही सप्तर्षी सनातनच्या तिन्ही गुरूंच्या शरिराचे रक्षण करत आहोत.

२ ए. ‘सनातनचे तीन गुरु भगवंताचा अवतार आहेत’, असा वैकुंठाचा शिक्का असलेले महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे सप्तर्षी जीवनाडीपट्टी !

महर्षी : आज सकाळी भ्रमणभाषवर आई (पू. (सौ.) शैलजा परांजपे) तुमच्याशी (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याशी) बोलतांना सप्तर्षींविषयी बोलत होत्या ना ?

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : हो. आज आईशी सप्तर्षींविषयी चर्चा झाली.

महर्षी : गुरुदेव, उत्तरापुत्री (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) आणि कार्तिकपुत्री (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) जे काही बोलतात, ते सर्व आम्ही सप्तर्षी ऐकत असतो. ‘सनातनचे तीन गुरु हे भगवंताचा पृथ्वीवरील अवतार आहेत’, असा वैकुंठाचा शिक्का असलेले कागदपत्र (रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स) म्हणजे सप्तर्षी जीवनाडीपट्टी ! हे कागदपत्र लिहिणारे स्वतः ब्रह्मदेव आहेत, ते लिहायला सांगणारे स्वयं शिवशंकर आहेत आणि या कागदपत्रावर साक्षात् श्रीमन्नारायणाने मोहोर लावली आहे. ‘सनातनचे तीन गुरु ‘अवतार’ नाहीत’, असे कुणी म्हणू शकत नाही; कारण यांची कागदपत्रे आम्हा सप्तर्षींकडे आहेत.’

२ ऐ. सनातनच्या तीन गुरूंसाठी असलेल्या गरुड पताका, सिंह पताका आणि वृषभ पताका : ‘सनातन संस्थेच्या तीन गुरूंसाठी नेहमी सूक्ष्मातून ‘गरुड पताका’, ‘सिंह पताका’ आणि ‘वृषभ पताका’ असेल. जेव्हा तीन गुरूंचा विजयोत्सव साजरा करण्यात येईल, तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांची ‘गरुड पताका’, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची ‘सिंह पताका’ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची ‘वृषभ पताका’ असेल. ‘गरुड पताका’ हे श्रीविष्णूचे प्रतीक आहे, ‘सिंह पताका’ हे आदिशक्तीचे प्रतीक आहे आणि ‘वृषभ पताका’ हे शिवाचे प्रतीक आहे.’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९७ (७.३.२०२२))

सप्तर्षींच्या चरणी कृतज्ञता

‘हे सप्तर्षींनो, आम्ही सनातनचे साधक तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत. तुमच्यामुळे या कलियुगात आम्हाला भगवंताचे अवतार असलेल्या सनातनच्या ३ गुरूंच्या अवतारी कार्याची ओळख झाली. ‘सनातनचे ३ गुरु आम्हा साधकांसाठी काय करत आहेत ?’, हे आम्हाला ऋषीवाणीतून ऐकायला मिळाले’, यासाठी आम्ही सर्व साधक सप्तर्षींच्या चरणी त्रिवार वंदन करतो !’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), चेन्नई, तमिळनाडू. (८.५.२०२२)


मातेप्रमाणे साधकांप्रती प्रेम, शिस्तप्रियता आणि कर्तव्यदक्षता असणाऱ्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. स्वाती गायकवाड (आताच्या सौ. स्वाती शिंदे) यांना विवाहाच्या वेळी मायेने जवळ घेतलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘आईच्या दुधात भेसळ करता येत नाही. त्याचप्रमाणे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील आदिशक्तीचे तत्त्व कितीही संकटे आली, तरी भेसळ होणारे नाही. आईमध्ये जसे पुत्राप्रती प्रेम, करुणा, शिस्तप्रियता, कर्तव्यदक्षता आदी गुण आढळतात, तसे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यात साधकांप्रती प्रेम, करुणा, शिस्तप्रियता आणि कर्तव्यदक्षता हे गुण आढळतात.’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९८ (१५.४.२०२२))

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपात दत्तगुरु रामनाथी आश्रमात निवास करत असल्यामुळे गोशाळेतून गोपूजनासाठी आणलेले गाय-वासरू परत जाण्यास सिद्ध नसणे !

पूजेनंतर गायीला प्रार्थना करणाऱ्या उजवीकडून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, पू. नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु मुकुल गाडगीळ

‘१६.१.२०२२ या दिवशी रामनाथी आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांच्या हस्ते गोमाता आणि वासरू यांचे पूजन करण्यात आले. पूजेनंतर गोमाता आणि वासरू गोशाळेत जायला सिद्धच होत नव्हते; कारण दत्तगुरु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपात रामनाथी आश्रमात निवास करत आहेत. आश्रमात गोमातेला दत्तात्रेयांकडे आल्यासारखे वाटले.’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९६ (३.२.२०२२))

(‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई त्या गोमातेला म्हणाल्या, ‘हा आश्रम तुझाच आहे. ‘तू येथून जावेस’, असे आम्हालाही वाटत नाही; मात्र आता तू जा आणि नंतर परत ये.’ त्यानंतर गोमाता आणि वासरू जायला सिद्ध झाले.’ – संकलक)  

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘मी अवतार आहे’, असे म्हटलेले नाही. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले,  श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे भगवंताचे अवतार आहेत’, असे महर्षींनी नाडीपट्टीत सांगितले आहे. ‘सनातन प्रभात’च्या संपादकांचा महर्षींप्रती भाव असल्यामुळे आम्ही या विशेषांकात लिखाण प्रसिद्ध करत आहोत. – संपादक